भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये (World Athletics Championships) जबरदस्त खेळी केली आहे. नीरज चोप्राने मेन्स जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरजने आपल्या पहिल्या प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम सामन्यात आपली जागा नक्की केली आहे. 27 ऑगस्टला अंतिम सामना खेळला जाणार आहे. 


पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचा हंगामातील हे नीरज चोप्राची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. याआधी त्याची सर्वात्तम कामगिरी 88.67 मीटर होती. या चॅम्पिअनशिपमध्ये नीरज चोप्रासह जगभरातील 37 खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नीरज चोप्रा यासह पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत खेळलं जाणार आहे. 



नीरज चोप्रा ग्रुप-ए मधून खेळत होता. या गटात अँडरसन पीटर्स आणि ज्युलिअन पीटर्सही होते. ग्रुप-बी मध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि जॅकब वाडलेच यांच्यासारखे स्टार खेळाडू होते. जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी 83 मीटर दूर भाला फेकण्याची अट आहे. नीरज चोप्राने अत्यंत सहजपणे हे अंतर पार केलं. 


 नीरज चोप्राने अमेरिकेतील 2022 वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. दरम्यान, सध्या नीरज चोप्रा सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहे. जर नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं तर तो नेमबाज अभिनव बिंद्राच्या रेकॉर्डची बरोबरी करेल. अभिनव बिंद्राने ऑलिम्पिकनंतर वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली होती. अभिनव बिंद्राने 2008 मध्ये व्यक्तिगत स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं होतं.


वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या आधी नीरज चोप्राने या हंगामात फक्त दोन उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये (दोहा आणि लॉसने डायमंड लीग) सहभाग नोंदवला होता. या दोन्ही स्पर्धांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता. दरम्यान, या स्पर्धांदरम्यान जखमी झाल्याने त्याने एक महिना आराम केला. जवळपास दोन महिने आराम आणि प्रशिक्षण झाल्यानंतर नीरज चोप्राने आपण या स्पर्धेसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. ही स्पर्धा ऑलिम्पिक दर्जाची आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीत नीरज चोप्रासह चेक गणराज्यचा जाकूब वाडलेच, जर्मनीचा ज्युलिअन वेबर आणि गतविजेता अँडरसन पीटर्सही आहेत.