नीरज चोप्राने पाकिस्तानचा ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीमला २४ मे रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, पाकिस्तानचा ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीमने नीरज चोप्राचे आमंत्रण नाकारले आहे. अर्शद नदीम म्हणाला की, या काळात तो आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या तयारीत व्यस्त असेल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अर्शदचे हे विधान आले आहे. दरम्यान अर्शदला नीरज चोप्राने आमंत्रण पाठवल्यामुळे आता नीरज चोप्रा चांगलाच ट्रोल होत आहे. याचा त्याला त्रास होत असल्याची एकक पोस्ट नीरजने केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भालाफेकपटू नीरज चोप्राने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमला नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला आहे. 2 दिवसांच्या सततच्या ट्रोलिंग नंतर या भालाफेकपटूने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अर्शद नदीमचा या स्पर्धेत सहभाग आता पूर्णपणे अशक्य आहे.
नीरज चोप्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी सहसा कमी बोलणारा माणूस असतो पण याचा अर्थ असा नाही की मी जे चुकीचे मानतो त्याविरुद्ध बोलणार नाही. जेव्हा माझ्या देशावरील प्रेमावर आणि माझ्या कुटुंबाच्या आदरावर आणि सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची वेळ येते तेव्हा मी बोलणार. नीरज चोप्रा क्लासिकमध्ये भाग घेण्यासाठी अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल खूप चर्चा झाली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सोमवारी सर्व खेळाडूंना आमंत्रणे देण्यात आली होती."
चोप्रा पुढे म्हणाला की, नीरज चोप्रा क्लासिक कार्यक्रमासाठी अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांना खूप द्वेष आणि शिवीगाळ सहन करावी लागली आहे. त्यांनी असेही म्हटले की, त्यांच्या कुटुंबालाही यात ओढण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर देशावरील त्यांच्या प्रामाणिकपणा आणि प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे याबद्दल चोप्राने पुढे लिहत दुःख व्यक्त केले.
टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्याने पुढे सांगितले की, पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधी त्याने नदीमला आमंत्रण दिले होते, परंतु हल्ल्यानंतर, नदीमचा या स्पर्धेत सहभाग घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.