Champions Trophy 2025 : यंदा तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचं आयोजन पाकिस्तानात करण्यात आलं होतं. भारत वगळता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधील इतर सर्व देशांचे सामने हे पाकिस्तानात झाले. एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचं यशस्वीपणे आयोजन केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जिथे स्वतःची पाठ थोपटून घेतोय तिथे दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pakistan Cricket Board) आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे समोर येत आहे. पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर लगेचच एक मोठं पाऊल उचललं असून देशांतर्गत क्रिकेट सामन्याच्या मॅच फीमध्ये जवळपास 90 टक्क्यांची कपात केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी नॅशनल टी 20 चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची मॅच फी एक लाख रुपये प्रति सामन्याने कमी करून 10 हजार रुपये प्रति सामना एवढी केली आहे. रिजर्व खेळाडूंना प्रति सामना 5 हजार रुपये मिळतील. ही स्पर्धा 14 मार्च रोजी सुरु होणार आहे. फक्त नॅशनल टी 20 चॅम्पियनशिपवरच नाही तर देशांतर्गत क्रिकेटच्या विकासावरही करण्यात येत असलेल्या खर्चात पीसीबी कपात करणार आहे. मॅच फी मध्ये 90 टक्के कपात झाल्यामुळे खेळाडूंच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी रँकिंगमध्ये मोठे बदल, रोहित शर्माने विराटला टाकलं मागे
पीसीबीमध्ये देशांतर्गत क्रिकेटचे प्रमुख अब्दुल्ला खुर्रम खेळाडूंच्या सुविधेत सुद्धा कपात करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 'देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा यापूर्वी 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जायची. मात्र आता स्वस्त हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच त्यांच्या विमान प्रवासावरील खर्च सुद्धा कमी करण्यात येणार असून त्यांच्या मॅच फी मध्ये कपात करण्यात आली आहे'.
एका सूत्राने सांगितले की मागच्या सीजनमध्ये खेळलेल्या खेळाडूंना आणि अंपायरना अजूनपर्यंत थकबाकी देण्यात आलेली नाही. पीसीबीने माजी क्रिकेटरसाठी वाढीव पेन्शन स्कीम सुद्धा लागू केली आहे. जी बोर्डाच्या पॉलिसीप्रमाणे दरवर्षी करणे आवश्यक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी लाहोर, कराची आणि रावलपिंडी इत्यादी स्टेडियम अपग्रेड करण्यासाठी जवळपास 1.8 अरब रुपये खर्च करण्यात आले. परंतु आश्चर्याची गोष्टी ही की जिथे खेळाडूंच्या फी मध्ये कपात करण्यात आली आहे. तिथे पीसीबीच्या अधिकाऱ्यांना मात्र लाख रुपये मासिक पगार म्हणून दिले जात आहेत.