'या' गोलंदाजाने टेस्ट करिअरमध्ये कधीच फेकला नाही नो बॉल, सध्या तुरुंगात भोगतोय शिक्षा

Test Cricket Record : जगात एक असा क्रिकेटर आहे ज्याने त्याच्या 21 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एक सुद्धा नो बॉल टाकलेला नाही. बऱ्याचदा गोलंदाज ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना नो बॉल टाकतात.

पुजा पवार | Updated: Mar 17, 2025, 01:27 PM IST
'या' गोलंदाजाने टेस्ट करिअरमध्ये कधीच फेकला नाही नो बॉल, सध्या तुरुंगात भोगतोय शिक्षा
(Photo Credit : Social Media)

Test Cricket Record : क्रिकेटमध्ये दरवर्षी अनेक रेकॉर्ड बनतात आणि मोडले सुद्धा जातात. पण टेस्ट क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने असा रेकॉर्ड केला आहे ज्याला मोडणं आजतागायत कोणत्या स्टार खेळाडूला जमलं नाही. जगात एक असा क्रिकेटर आहे ज्याने त्याच्या 21 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एक सुद्धा नो बॉल टाकलेला नाही. बऱ्याचदा गोलंदाज ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना नो बॉल टाकतात. क्रिकेट इतिहासात गोलंदाजांनी केलेल्या या चुकीमुळे संघांना सामना गमवावा सुद्धा लागला आहे. 

गोलंदाजाने कधीच टाकला नाही नो बॉल : 

पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक गोलंदाज असा सुद्धा आहे ज्याने 21 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट करिअरमध्ये एकदाही नो बॉल टाकलेला नाही. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार इमरान खान आहे. इमरान खान याने 21 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एकदाही नो बॉल टाकलेला नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान याने टेस्टमध्ये एकूण 362 विकेट घेतले असून यात त्याने एकही नो बॉल टाकलेला नाही. इमरान त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानला 1992 वर्ल्ड कप जिंकवून दिला होता.  

इमरान खान हा 1982  मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बनला होता. इमरानच्या कर्णधारपदाची कारकिर्दीत त्याने पाकिस्तानला त्याचा एकमेव आणि पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. इमरान खानने 3 जून 1971 मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इमरानने त्याच्या करिअरमधील शेवटचा टेस्ट सामना हा 2 जनवरी 1992 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. इमरान खानने 31 ऑगस्ट 1974 रोजी इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. तर वनडेत शेवटचा सामना त्याने 25 मार्च 1992  रोजी खेळला होता. 

हेही वाचा : वडील चालवायचे टेम्पो, भावाने स्वतःच जीवन संपवलं, 'या' गोलंदाजाला अचानक मिळावी IPL 2025 खेळण्याची संधी

 

माजी क्रिकेटर इमरान खान हा गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये माहीर होता. इमरान खान याने त्याच्या करिअरमध्ये 88 टेस्ट आणि 175 वनडे सामने खेळले ज्यात त्याने 3807 आणि 3709 धावा केल्या. इमरान खानने टेस्ट क्रिकेटमध्ये 362 आणि वनडेमध्ये 182 विकेट घेतले. इमरान खानने पाकिस्तानसाठी खेळताना टेस्ट सामन्यात 18644 बॉल टाकले पण त्यात एकही नो बॉल टाकला नाही. यावरून कळते की इमरान खानची गोलंदाजी किती शिस्तबद्ध होती. 

इमरान खान सध्या तुरुंगात भोगतोय शिक्षा : 

इमरान खान हा केवळ पाकिस्तानचा माजी क्रिकेटर नसून तो पाकिस्तानचा माजी पंतप्रधान सुद्धा आहे. क्रिकेटनंतर त्याने राजकारणाकडे मोर्चा वळवला. एआरवाई न्यूजच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या न्यायालयाने जमीन भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान असलेल्या इमरानला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सध्या इमरान खान हा पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहे.