'त्या' टोपीमुळे 4.30 लाख दंड, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून वगळलं... पण या 804 चा अर्थ काय?

Cricketer Fined For This Cap: या प्रकरणामुळे सदर क्रिकेटपटूचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठीही क्रिकेट बोर्डाकडून विचार करण्यात आला नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 18, 2025, 03:49 PM IST
'त्या' टोपीमुळे 4.30 लाख दंड, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून वगळलं... पण या 804 चा अर्थ काय?
चार लाखांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावण्यात आला

Cricketer Fined For This Cap: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आमीर जमाल अडचणी सापडला आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन आमीर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये आमीरला 1.4 मिलियन पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनानुसार 4 लाख 33 हजार रुपये) इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र एवढ्याच्या चुकीसाठी एवढा मोठा दंड ठोठावण्यामागे एक विशेष कारण आहे. 

नेमकी काय चूक केली या खेळाडूने?

आमीर जमालच्या टोपीवर '804' हा आकडा लिहिण्यात आल्याचं दिसून आल्यानंतर त्याच्यावर नियम मोडल्याचा ठपका ठेवत एवढा मोठा दंड आकारण्यात आला. हा आकडा पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी संबंधित आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अनेक पाकिस्तानी खेळाडूंविरोधात नियम मोडल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला असून सर्वाधिक मोठी शिक्षा आमीर जमालला देण्यात आली आहे. 

या आकड्याचं नेमका अर्थ काय?

पीटीआय या पाकिस्तानमधील राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा असलेले आणि देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत आहेत. त्यांचा कैदी क्रमांक 804 असा आहे. हा क्रमांक आपल्या टोपीवर लिहून आमीर जमालने इम्रान खान यांना पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेलं चिन्हं किंवा मजकूर मैदानावर वापरल्याचा ठपका ठेवत आमीर जमालला दोषी ठरवण्यात आलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही मुकला

मैदानावर राजकीय भूमिका रेटण्याचा प्रयत्न केल्याच्या करणामुळे आमीर जमालला पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही स्थान देण्यात आलेलं नव्हतं. राजकीय भूमिकांना खेळाच्या मैदानावर कोणतंही स्थान देता येणार नाही, अशी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची भूमिका असल्याने आमीर जमालला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातूनही वगळण्यात आलं.

इतर खेळाडूंनाही ठोठावण्यात आला दंड

सलीम आयूब, सलमान अली आघा आणि अब्दुल्ला शफीक या तिघांना प्रत्येकी 5 लाख पाकिस्तानी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये उशीरा पोहोचल्याचा ठपका या खेळाडूंवर ठेवण्यात आला आहे. उस्मान खान, अब्बास आफ्रिदी आणि सुफियान मुकीम यांना प्रत्येकी 200 अमेरिकी डॉलर दंड ठोठावण्यात आलं आहे. याचवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्याला उशीरा आल्याबद्दल त्यांना हा दंड ठोठावला गेला आहे.