वडिलांच्या एका सल्ल्याने बदललं 'या' खेळाडूच आयुष्य! व्हायचं होतं इंजिनियर पण झाला स्विंग मास्टर

Zaheer Khan's Birthday: झहीर खान हा भारतीय क्रिकेट इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. हा वेगवान गोलंदाज मंगळवारी 47 वर्षांचा होईल.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 7, 2025, 09:18 AM IST
वडिलांच्या एका सल्ल्याने बदललं 'या' खेळाडूच आयुष्य! व्हायचं होतं इंजिनियर पण झाला स्विंग मास्टर

Happy Zaheer Khan's Birthday: भारतीय क्रिकेटमधील सर्वात दमदार गोलंदाजांपैकी एक असलेल्या जहीर खानचा आज वाढदिवस आहे. मंगळवारी हा माजी पेसर आपल्या आयुष्याचे 47 वर्ष पूर्ण करत आहे. जहीर खानने आपल्या स्विंग आणि अचूक लाइन-लेंथच्या जोरावर भारताला अनेक संस्मरणीय सामने जिंकवून दिले. 2011 च्या विश्वचषक विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. 7 ऑक्टोबर 1978 रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे जन्मलेल्या जहीर खानचं स्वप्न सुरुवातीला इंजिनिअर होण्याचं होतं, पण वडिलांच्या एका सल्ल्याने त्याचा आयुष्याचा ट्रॅकच बदलून गेला.

Add Zee News as a Preferred Source

वडिलांचा सल्ला ठरला टर्निंग पॉइंट

जहीर खान उत्कृष्ट वेगवान गोलंदाज ठरला, पण त्यामागे वडिलांचा दृष्टिकोन वेगळा होता. ते मुलाने इंजिनिअर व्हावं असं नव्हे, तर देशासाठी क्रिकेट खेळावं अशी त्यांची इच्छा होती. एका दिवशी त्यांनी जहीरला सांगितलं की, "देशात इंजिनिअर खूप आहेत, पण एक चांगला फास्ट बॉलर मात्र दुर्मिळ आहे. तू देशासाठी खेळायला हवा." जहीरने वडिलांचा सल्ला मनापासून स्वीकारला आणि तिथूनच त्याचा प्रवास सुरू झाला.

मुंबईत सुरुवात आणि डेनिस लिलीची नजर

जेव्हा जहीर 17 वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वडील त्याला मुंबईला घेऊन गेले. तिथे एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये त्याला संधी मिळाली. दिग्गज प्रशिक्षक डेनिस लिली यांनी त्याच्या कौशल्याची दखल घेतली आणि त्याच्या गोलंदाजीत सुधारणा घडवून आणली. जिमखाना संघाविरुद्धच्या फायनल सामन्यात त्याने 7 बळी घेत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर जहीरला मुंबई आणि वेस्ट झोन अंडर-19 संघात स्थान मिळाले.

फॉर्म गेला आणि पुन्हा परतला नकल बॉलसह

घरेलू क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर जहीर खानला 2000 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याच वर्षी त्याने टेस्ट आणि वनडे दोन्ही स्वरूपात डेब्यू केला. 2002 मध्ये त्याने 15 टेस्टमध्ये 51 विकेट घेतल्या, पण पुढील काही वर्षांत त्याचा फॉर्म घसरला आणि तो संघाबाहेर झाला. या काळात जहीरने नवी डिलिव्हरी — ‘नकल बॉल’ — विकसित केली, ज्यामुळे त्याने पुन्हा दमदार पुनरागमन केलं.

स्विंगचा मास्टर

जहीर खान स्विंगचा सम्राट मानला जातो. त्याच्या चेंडूंची दिशा ओळखणं फलंदाजांसाठी कठीण काम असे. नवीन आणि जुनी दोन्ही चेंडू त्याने अप्रतिमरीत्या स्विंग केली. त्याची अचूक लाइन-लेंथ, प्रभावी यॉर्कर आणि डाव्या हाताचा कोन हे सर्व एकत्र येऊन प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत.

विश्वचषकातील अप्रतिम कामगिरी

2003 च्या विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली जहीरने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 11 सामन्यांत 18 विकेट घेतल्या आणि तो त्या स्पर्धेतील चौथा सर्वोच्च विकेटटेकर्स होता. 2007 मध्येही तो संघात होता. मात्र, 2011 च्या विश्वचषकात त्याने खऱ्या अर्थाने कमाल केली.  9 सामन्यांत 21 विकेट घेत भारताच्या विजयानं महत्त्वाची भूमिका बजावली. त्या स्पर्धेत तो शाहिद आफ्रिदीसह संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

जहीर खानचा एकूण करिअर रिपोर्ट

जहीर खानने आपल्या टेस्ट करिअरमध्ये 92 सामने खेळून 311 विकेट घेतल्या आणि 11 वेळा पाच किंवा अधिक बळी मिळवले. वनडेमध्ये त्याने 200 सामन्यांत 282 विकेट घेतल्या, तर 17 टी20 सामन्यांत 17 विकेट्स मिळवल्या. पहिल्या श्रेणीच्या 169 सामन्यांत त्याच्या नावावर 672 विकेट आहेत, तर 253 लिस्ट-ए सामन्यांत त्याने 357 बळी घेतले आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaheer Khan (@zaheer_khan34)

जहीर खान केवळ भारताचा नव्हे, तर जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या मेहनतीने आणि वडिलांच्या त्या एका सल्ल्याने भारतीय क्रिकेटला मिळाला एक असा बॉलर, ज्याचं नाव आजही आदराने घेतलं जातं.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More