बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिती झिंटाने राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबतचे काही एडिटेड फोटो शेअर केल्याने संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत प्रिती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी जयपूरच्या सवाई गंधर्व स्टेडिअममध्ये एकमेकांना मिठी मारताना दाखवण्यात आले आहेत. सोमवारी राजस्थान रॉयल्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओनंतर हा वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये प्रीती सामन्यापूर्वी वैभवची भेट घेताना दिसत आहे. एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडीओ क्ल्पिमध्ये दोघे एकमेकांशी गप्पा मारताना आणि हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
मात्र, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये प्रिती वैभव सूर्यवंशीला मिठी मारताना दिसत आहे, जे खऱ्या व्हिडीओत दिसत नाही. यानंतर हे फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर प्रिती झिंटाने फोटोसह एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “हा एक मॉर्फ केलेला फोटो आणि खोटी बातमी आहे.”
दुसऱ्या पोस्टमध्ये, एका स्थानिक रिपोर्टचा संदर्भ देत तिने पुढे म्हटलं आहे की, “मॉर्फ केलेल्या फोटोसह खोट्या बातम्या. मला खूप आश्चर्य वाटत आहे की आता वृत्तवाहिन्या देखील मॉर्फ केलेले फोटो वापरत आहेत आणि त्यांना बातम्या म्हणून दाखवत आहेत.”
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान दोघांची भेट झाली होती. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 10 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, प्रीती झिंटा सात वर्षांच्या विश्रांतीनंतर चित्रपटांमध्ये परतण्याची तयारी करत आहे. तिचा शेवटचा चित्रपट भैयाजी सुपरहिट (2018) होता. यानंतर आता ती राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित 'लाहोर 1947' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये सनी देओल, शबाना आझमी आणि अली फजल देखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.