Prithvi Shaw vs Musheer Khan : मुशीर खानला मारण्यासाठी का धावला पृथ्वी शॉ? समोर आले कारण

Prithvi Shaw Mushir Khan Fight:  मुंबई क्रिकेट असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यात पृथ्वी शॉने मुशीर खानला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने असं का केलं यामागचे कारण समोर आले आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 8, 2025, 02:59 PM IST
Prithvi Shaw vs Musheer Khan : मुशीर खानला मारण्यासाठी का धावला पृथ्वी शॉ? समोर आले कारण

 Prithvi Shaw Mushir Khan Fight Video: पुण्यात महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यात झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात मोठा वाद पेटला. महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मुंबईचा तरुण खेळाडू मुशीर खान यांच्यात मैदानावर चांगलीच चकमक झाली. शॉ पूर्वी मुंबईसाठीच खेळत असे, पण आता संघ बदलल्यानंतर तो पहिल्यांदाच आपल्या जुन्या सहकाऱ्यांसमोर उतरला होता.

Add Zee News as a Preferred Source

पृथ्वी शॉ आणि मुशीर खानमध्ये काय घडलं?

या सामन्यात पृथ्वी शॉनं महाराष्ट्रासाठी खेळताना केवळ 220 चेंडूत 181 धावांची दमदार खेळी केली. पण 74व्या षटकात मुशीर खानच्या गोलंदाजीवर तो डीप फाइन लेगवर झेलबाद झाला. यानंतर शॉ पॅव्हेलियनकडे परतताना मुशीरनं त्याला “थॅंक यू” म्हणत स्लेजिंग केली. हा कमेंट ऐकताच शॉ चिडला आणि थेट मुशीरकडे धावत गेला. त्याने त्याचा कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला आणि हातातील बॅट उचलली. मात्र, अंपायर आणि इतर खेळाडूंनी तातडीने मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली.

हे ही वाचा: कॉलर पकडली, बॅट उचलली, मारण्यासाठी धावला अन्... विकेट पडताच पृथ्वी शॉचा मैदानातच राडा Video Viral

वादाचं व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचं व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. व्हिडिओमध्ये एक अंपायर पृथ्वी शॉला शांत करताना आणि त्याला बाजूला नेताना दिसतोय. महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे यांनी या घटनेबद्दल बोलताना म्हटलं, “हा एक सराव सामना आहे. सगळे एकमेकांचे माजी सहकारी आहेत. अशा गोष्टी घडतात. आता सगळं ठीक आहे.”

 

पृथ्वी शॉची फॉर्म आणि संघबदल

मुंबई संघातून बाहेर पडल्यानंतर शॉनं महाराष्ट्रासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानं बुची बाबू स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध 111 धावा करून आपल्या पुनरागमनाची झलक दाखवली होती. आता पुण्यातील या सामन्यातही त्याने प्रभावी शतक ठोकत 400 च्या वर स्कोअर नेला.

वादावर अधिकृत भूमिका नाही

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) या दोन्ही संस्थांनी या प्रकरणावर कोणताही अधिकृत निवेदन दिलेला नाही. घटनेला “अति उत्साही खेळाडूंमधील लहानशी झडप” म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे.

हे ही वाचा: ODI कर्णधारपद गेल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “ऑस्ट्रेलियात मला..."

 

शॉचा विवादांशी जुना संबंध

पृथ्वी शॉ भारतीय संघासाठी पाच कसोटी, सहा वनडे आणि एक टी20 सामना खेळला आहे. मात्र, मागील काही काळात तो संघाबाहेर आहे. रणजी ट्रॉफीत कामगिरी घसरल्यानंतर त्याची मुंबई संघातूनही हकालपट्टी झाली आणि त्यानंतर त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. शॉच्या करिअरमध्ये विवाद नवीन नाहीत – आणि आता या घटनेनं पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More