भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ व्हायरल झाल होता. पृथ्वी शॉने 9 नोव्हेंबरला आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. टीव्ही इंडस्ट्रीतील आपल्या मित्रांसह त्याने वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यान मित्रांसह बेधुंदपणे 'तांबडी चामडी' गाण्यावर नाचतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांना त्याला पुढचा विनोद कांबळी म्हणून हिणवलं होतं. दरम्यान पृथ्वी शॉने या सर्व टीका, ट्रोलिंगला अखेर उत्तर दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओत पृथ्वी शॉ नाचताना आणि पार्टी करताना दिसत होता. पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. एक्सवर हा व्हिडीओ शेअर करताना एका युजरने लिहिलं होतं की, 'लारा, सचिन, सेहवाग फक्त विचार करु शकतात असं आयुष्य पृथ्वी शॉ जगत आहे'. यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या. एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, 'तो लारा, सचिन किंवा सेहवाग आहे का माहिती नाही पण शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर आणि प्रेम चोप्रा आहे'. एकाने सचिनपासून कांबळीपर्यंतचा प्रवास असा टोला लगावला होता.
"मी कुठेही दिसलो की पृथ्वी शॉ प्रॅक्टिस करत नाही, इथे आहे अशी टीका होते. मग मी विचार करतो अरे आज तर माझा वाढदिवस आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तांबडी चामडी गाण्यावर मी डान्स केल्याने ट्रोल झालो," असं पृथ्वी शॉने सांगितलं.
पुढे तो म्हणाला की, "माझ्या बहिणी, वहिनी, मित्र तिथे होते. माझा 25 वा वाढदिवस आहे आणि मी तांबडी चामडी डान्स करत मजा करत होतो. माझ्या एका बहिणीने तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. त्यावरुन मी ट्रोल झालो. आम्ही पृथ्वी संघात यावा यासाठी आम्ही प्रार्थना करतोय आणि हा तांबडी चामडी करतोय. मी विचार करतोय, मी वर्षातील एक दिवस तर साजरा करु शकतो. नाही साजरा केला तरी ट्रोल करता. मी काय चुकीचं केलं असा विचार करु लागलो. मी चुकीचं केलं असेल तर मलाही माहिती असते. गोष्टीची एक बाजू दाखवत चुकीचं ठरवलं जाऊ नये".
#PrithviShaw Sad Man To See uR Downfall Really Sad Man #PrithviShaw #ipl2025auction @mipaltan @RCBTweets pic.twitter.com/tuHczWEEgG
— CHANDU (@GREATCHANDU1) November 25, 2024
"जर तो मला फॉलो करत नसेल, तर मग ट्रोल कसं करणार? याचा अर्थ त्याचं माझ्यावर लक्ष आहे. ही चांगली बाब आहे," असं पृथ्वी शॉ म्हणाला. यावेली त्याने ट्रोलिंगमुळे भावना दुखावतात हे मान्य करताना संतुलित दृष्टीकोन ठेवत असल्याचं सांगितलं. "मला वाटतं ट्रोलिंग ही फार चांगली बाब नाही, पण ही फार वाईट गोष्टही नाही," असं तो म्हणाला.
पृथ्वी शॉने यावेळी आपण आपल्यावर तयार करण्यात आलेले मिम्स, पोस्ट पाहतो असंही सांगितलं. "जर लोक माझ्यावर मिम्स करत असतील तर मीदेखील ते पाहतो. कधीतरी मला वाईट वाटतं," असंही त्याने सांगितलं.
सहा वर्षांपूर्वी भारतीय संघात पदार्पण केल्यापासून पृथ्वी शॉने पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. फिटनेस आणि शिस्तभंगाच्या बाबींमुळे त्रिपुराविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबई संघातून वगळण्यात आलं. तो नियमितपणे मुंबईच्या प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहत नव्हता आणि वजनही वाढलं होतं. ज्यामुळे निवडकर्त्यांनी इतर पर्याय चाचपडले आणि त्यांची निवड केली. दुसरीकडे आयपीएलमध्ये त्याला एकाही संघाने विकत घेतलेलं नाही.