इस्लामाबाद : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आले आणि शोएबने निवृत्तीची घोषणा केली. ट्विटरद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान शोएब मलिक हा भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पती आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सानियाने भावनिक ट्विट केले आहे. प्रत्येक कथेला शेवट असतो पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते, असे म्हणत शोएबबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. 


९ शतके, ४४ अर्धशतके झळकावली


विश्वचषकातील शोएब मलिकच्या कामगिरीवर विशेषत: भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीवर चांगलीच टीका झाली होती. मलिकने २८७ एकदिवसीय सामन्यात ३४.५५च्या सरासरीने ७ हजार५३४ धावा केल्या आहेत. त्याने ९ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत. तर २८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५८ विकेट घेतल्या आहेत. त्याने १९ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.