IPL 2025: 'मला RCB संघात पुन्हा यायचं नव्हतं,' कर्णधार रजत पाटीदारचा मोठा खुलासा, 'शब्द देतात अन् नंतर...'

बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये संघाने आश्वासन देऊनही बाहेर ठेवल्यानंतर आपण नाराज आणि संतापलेलो होतो असा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2025, 02:06 PM IST
IPL 2025: 'मला RCB संघात पुन्हा यायचं नव्हतं,' कर्णधार रजत पाटीदारचा मोठा खुलासा, 'शब्द देतात अन् नंतर...'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये जेव्हा संघाने आपल्याला आश्वासन दिल्यानंतरही दुर्लक्ष केलं तेव्हा प्रचंड नाराजी आणि संताप झाला होता असं उघड केलं आहे. संघातील खेळाडू जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आलं होतं. आयपीएल 2025 मध्ये विरा कोहलीनंतर आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं तेव्हा प्रचंज दबाव होता, मात्र विराटच्या सहकार्य दाखवणाऱ्या शब्दांमुळे दिलासा मिळाला असाही खुलासा त्याने केला. कर्णधारपदासह रजत पाटीदर मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिकाही योग्य साकारत आहे. त्याने 11 सामन्यात 239 धावा केल्या आहेत. 

"आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाआधी मला तू तयार राहा असा मेसेज मिळाला होता. आम्ही तुझी निवड करु असं सांगण्यात आलं होतं. मला बंगळुरु संघात खेळण्याची पुन्हा संधी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. पण मेगा लिलावात मला निवडण्यात आलं नाही. मी थोडा नाराज होतो," असं पाटीदारने बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं.

पण 31 वर्षीय रजत पाटीदारला आरसीबीकडून खेळण्यासाठी फार वाट पाहावा लागली नाही. कारण संघातील एक खेळाडू जायबंदी झाल्याने त्याला लगेच संघातून खेळण्यासाठी बोलावणं आलं. पण रजत पाटीदारला आपल्या खेळण्याची संधी फार कमी मिळेल याची कल्पना असल्याने तो संघात परतण्यास उत्सुक नव्हता. 

"लिलावात निवड न झाल्याने मी इंदोरमध्ये स्थानिक सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर मला फोन आला की, लवनिथ सिसोदिया जखमी झाल्याने आम्ही तुझी निवड करत आहोत. पण तुम्हाला खऱं सांगायचं तर मला बदली खेळाडू म्हणून जाण्याची इच्छा नव्हती. कारण मला खेळण्याची फार संधी मिळणार नाही याची कल्पना होती, मला डगआऊटमध्ये बसण्याची इच्छा नव्हती," असं रजत पाटीदार म्हणाला.

"मी रागावलो नव्हतो. माझं असं झालं होतं की, जर मला लिलावात निवडलं नसेल तर मला खेळायला मिळणार नाही. काही वेळासाठी रागावल्यानंतर नंतर मी सामान्य झालो," असं पाटीदार म्हणाला.

विराट कोहलीसारख्या महान खेळाडूनंतर आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर फार दबाव होता, मात्र त्याने पाठिंबा दिल्याने आत्मविश्वास वाढल्याचंही तो म्हणाला. त्याने सांगितलं की, "माझ्या मनात फार प्रश्न होते. संघात इतके मोठे खेळाडू आहेत. विराट इतका मोठा खेळाडू असताना त्याच्यासह कसं खेळणार. पण त्याने फार पाठिंबा दिला".

"मला माहित होतं की मला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे. मी म्हटल्याप्रमाणे, हे माझ्यासाठी शिकण्याचा अनुवव होता. माझ्यासाठी ही एक संधी आहे. म्हणून, मी त्याच्याकडून शक्य तितकं शिकेन. कारण प्रत्येक भूमिकेत त्याच्यासारखा अनुभव आणि कल्पना कोणाकडेही नाहीत. मग ती फलंदाजी असो, एक व्यक्ती म्हणून असो आणि कर्णधार म्हणून असो," असं पाटीदार म्हणाला.

ज्या दिवशी आरसीबी संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं तो दिवस पाटीदारसाठी सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक होता. कोहलीकडून फलक स्वीकारताना आपल्याला काहीच सुचत नव्हतं असं तो म्हणाला. 

"मी टीव्ही पाहण्यास सुरुवात केल्यापासून त्याला आयपीएलमध्ये, मैदानाबाहेर पाहत आहे. त्याच्याकडून कर्णधारपदाची पाटी घेणं हा वेगळा अनुभव होता. त्यानंतर, मी त्याच्याकडे असं पाहत होतो की, मी काय करावं? मग त्याने काही शब्द म्हटले, 'तू ते पात्र आहेस, तू ते मिळवलेस'. त्यामुळे मला थोडे बरे वाटले," असं त्याने सांगितलं.