IPL 2025 : भारत - पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने भारतात सुरु असलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे सध्य परिस्थितीत पुढील आठवडाभर आयपीएलचे सामने होणार नाहीत. मात्र तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आयपीएल 2025 चे उर्वरित सामने हे भारतात होणार की विदेशात याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठी माहिती दिली आहे.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतातील अनेक शहरांना पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन द्वारे लक्ष्य करण्यात आले होते. हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आल्याने धर्मशाला स्टेडियमवर गुरुवारी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना 10.1 षटकांनंतर रद्द करण्यात आला, ज्यामुळे आयपीएल 2025 च्या सुरक्षेच्या मोठ्या चिंता निर्माण झाल्या होत्या. यानंतर शुक्रवारी दुपारी बीसीसीआयने अधिकृत निवदेन जाहीर करून एक आठवड्यासाठी आयपीएल 2025 स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक कारण म्हणजे सध्या सुरु भारताचा पाकिस्तानशी संघर्ष. तर दुसरे कारण म्हणजे असे वृत्त येत आहे की बरेच खेळाडू, विशेषतः परदेशी क्रिकेटपटू, आता सामने खेळण्यास तयार नव्हते.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आम्ही सर्व स्टेकहोल्डर्स सोबत बोलणी करू आणि मग ठरवू की सामने कसे आयोजित केले जावेत. तसेच विदेशी खेळाडू स्वतः ठरवतील की त्यांना एक आठवडा इथेच भारतात राहायचंय की आपल्या देशात परत जायचंय. वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं आहे. आयपीएल पुढे होणार की नाही आणि कुठे होणार याचा निर्णय गवर्निंग काउंसिलद्वारे घेतला जाईल. या महत्वाच्या टप्प्यावर बीसीसीआय अतिशय मजबुतीने देशासोबत उभा आहे'.
हेही वाचा : 'अशी कोणतीच ताकद नाही जी पाकिस्तानला...', भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबर आझमचं खुलं आव्हान
मीडिया रिपोर्ट्सनुसार जर आयपीएल 2025 तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात होऊ शकली नाही तर उर्वरित सामान्यांचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत केलं जाऊ शकतं अशी माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी देखील काही अपरिहार्य कारणांमुळे आयपीएल विदेशात खेळवण्यात आलेली होती. यापूर्वी 2009 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात आले होते. तर 2014 मध्ये सुद्धा दुबई येथे आयपीएलचे सामने खेळवण्यात आले होते. मात्र पाकिस्तान सुपर लीग 2025 चे उर्वरित सामने हे तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईत खेळवले जाणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 चे सामने दुबईत होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे समजा आयपीएल 2025 चे सामने विदेशात खेळवण्याची वेळ आलीच तर हे सामने साऊथ आफ्रिकेमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे.