भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून अचानक निवत्ती जाहीर करत फक्त भारतच नाही तर जगभराती क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. विराट कोहलीच्या निर्णयाने काहींच्या भुवया उंचावल्या असताना, अनेकांनी विराटने फार आधीच यासंबंधी निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचं चक्र सुरु होत असताना, विराटला जर संघाला पात्र व्हायचं असेल तर त्याला आणि संघाला काही गोष्टी करण्याची गरज असल्याची जाणीव होती. दरम्यान रिपोर्टनुसार, विराट कोहलीला एक नवं आव्हान हवं होतं. बदल होत असताना आपल्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपद दिलं जावं अशी त्याची इच्छा होती. पण बीसीसीआय मात्र यासाठी तयार नव्हतं.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुण खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जावी हा व्यवस्थापनाचा निर्णय कळवण्यात आल्यानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्याला स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी आणि नव्याने वरती येण्यासाठी काही आव्हानं हवी होती. सध्याच्या व्यवस्थापनाखाली, त्याला हवे असलेले स्वातंत्र्य, वातावरण मिळत नव्हतं असं म्हटलं जात आहे. मागील ड्रेसिंग रूमच्या तुलनेत सध्याच्या सेटअपमधील वातावरण खूप वेगळे होते.
विराट कोहली मागील काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये आव्हानांचा सामना करत होता. त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नव्हत्या. मागील तीन वर्षात त्याने फक्त 32 च्या सरासरीने धावा केल्य होत्या. यामुळे त्याला नवीन आव्हानं हवी होती. दुर्दैवाने आव्हानांशिवाय कसोटी क्रिकेट खेळण्यात त्याला रस नव्हता.
रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीने निवृत्तीच्या निर्णयाआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि मित्र रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली. विराट कोहलीने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांच्याशी सल्लामसलत केली. पण यावेळी त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे समजू शकलं नाही. विराट आणि राजीव शुक्ला यांच्यातही बैठक होणार होती. मात्र भारत-पाकिस्तानातील तणावामुळे या भेटीसाठी योग्य वेळ मिळू शकली नाही.
रिपोर्टनुसार, विराट कोहली बीसीसीआयचा निवड समिती प्रमुख अजित आगरकरशीदेखील दोन वेळा फोनवरुन चर्चा केली. पण या चर्चेनंतरही विराट कोहलीला निवृत्तीच्या निर्णयावरुन मन वळवण्यात यश आलं नाही.
जर बीसीसीआयने इंग्लंड मालिकेनंतर बदलाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असता, तर विराट आणि रोहित दोघेही 5 सामन्यांच्या या कामगिरीनंतर निरोप घेऊ शकले नसते. परंतु, बोर्डाला एका निश्चित खेळ योजनेसह नवीन चक्र सुरू करायचे होते. म्हणून, निर्णय घ्यावा लागला असं समजत आहे.