'कधीतरी डगआउटमध्ये माझ्या शेजारी येऊन बसावं लागेल, तेव्हाच तुला...'; पॉन्टिंगची प्रीती झिंटाला भलतीच ऑफर

Ricky Ponting Reply To Preity Zinta: पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाअंतर्गत श्रेयसच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाने 2025 च्या आयपीएलच्या अंतिम फेरी गाठली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2025, 09:54 AM IST
'कधीतरी डगआउटमध्ये माझ्या शेजारी येऊन बसावं लागेल, तेव्हाच तुला...'; पॉन्टिंगची प्रीती झिंटाला भलतीच ऑफर
पंजाबच्या प्रशिक्षकाची प्रतिक्रिया चर्चेत

Ricky Ponting Reply To Preity Zinta: पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात कर्णधार श्रेयस अय्यरच्या मदतीने पंजाब किंग्जसच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरल्याने चर्चेत आहे. अलीकडेच पॉन्टिंग चर्चेत येण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याने पंजाबच्या संघाची सह-मालक प्रीती झिंटाच्या एका प्रश्नाला दिलेलं मजेदार उत्तर. क्रिकेट मैदानावरील पॉन्टिंगच्या आक्रमकतेबद्दल प्रीतीने विचारलेल्या प्रश्नाला त्याने मजेदार उत्तर दिले आहे. नेहमीच मनापासून क्रिकेट खेळणार आणि क्रिकेटवर प्रेम करणारा पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना संघाला दोन विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. कसोटी सामन्यांमध्ये, त्याने कर्णधार म्हणून 77 सामन्यांमध्ये 48 विजय मिळवताना इतिहासातील सर्वात प्रभावी संघांपैकी एकाचे नेतृत्व केले.

पॉन्टिंगची प्रीतीला ऑफर

प्रीती झिंटाच्या प्रश्नाचे उत्तर देताना, पॉन्टिंगने मी मैदानाबाहेर लोकांशी हसतो आणि विनोद करतो पण प्रशिक्षक म्हणून कामाचा विचार केला तर मी त्यासंदर्भात कायमच आक्रमक असतो, असं म्हटलं आहे. 'पंजाब किंग्ज'ने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये 50 वर्षीय पॉन्टिंगनं तो प्रशिक्षक म्हणून आक्रमक का असतो याबद्दलचं सविस्तर उत्तर प्रीतीला दिलं आहे. "तुला या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी कधीतरी डगआउटमध्ये माझ्या शेजारी येऊन बसावं लागेल. तेव्हाच तुला दिसेल की तिथे सारं काही नेहमी फारसं शांत आणि निवांतपणे सुरु नसते," अशी ऑफरच पॉन्टिंगने प्रीतीला दिली. "मी आक्रमक स्वभावाचा माणूस आहे, विशेषतः जेव्हा क्रिकेटबद्दल आपण बोलतो तेव्ही मी आक्रमकच असतो. इतर वेळेस मी हसतो आणि विनोद करतो, कॉफी घेतो आणि कोणासोबतही बसून गप्पा मारतो," असं पॉन्टिंग म्हणाला.

मी एक मिनिटही वाया घालवत नाही

"क्रिकेटच्या मैदानात नसताना मी क्रिकेट वगळता कोणत्याही गोष्टीबद्दल बोलतो. पण जेव्हा क्रिकेटची वेळ असते तेव्हा या संघाकडून उच्च दर्जाची कामगिरी करुन घेणे हे माझे काम असते. आणि म्हणून मी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना एक मिनिटही वाया घालवत नाही. मी प्रशिक्षक म्हणून एकही दिवस वाया घालवणार नाही. मी असं एकही सराव सत्र नाही जिथे मी सर्वोत्तम प्रशिक्षक बनण्याचा प्रयत्न करत नाही. माझ्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या/शिकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम खेळाडू बनवण्याचा प्रयत्न मी करत असतो," असं पॉन्टिंग म्हणाला. 

प्रशिक्षक म्हणून दमदार रेकॉर्ड

आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून पॉन्टिंग्जचा रेकॉर्ड प्रभावशाली आहे. त्याने प्रशिक्षक म्हणून 2015 मध्ये मुंबई इंडियन्सला जेतेपदापर्यंत पोहोचवलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली, दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये त्यांचा पहिला अंतिम सामना खेळला आणि 2025 मध्ये पंजाबचा संघ फायनलपर्यंत पोहचला.

पंजाबला अनुभव कमी पडला

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बोलताना पॉन्टिंगने संघातील खेळाडूंना फारसा अनुभव नसल्याचा फटका बसल्याचं मत व्यक्त केलं. मात्र हेच खेळाडू दीर्घकाळ फ्रँचायझीसाठी चांगले काम करतील असा विश्वास पॉन्टिंगने व्यक्त केला आहे. आयपीएलच्या अंतिम सामना पराभूत होण्याची ही पंजाब किंग्जची दुसरी वेळ आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केलं होतं.