चेन्नई सुपर किंग्स संघाचा `हा` खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप
चेन्नईच्या `या` खेळाडूला कन्यारत्न, सोशल मीडियावर नावही जाहीर
मुंबई : टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि चेन्नईच्या खेळाडू असलेल्या रॉबिन उथप्पाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रॉबिनच्या पत्नी शीतल उथप्पाने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. रॉबिनने फोटो पोस्ट करून या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
रॉबिन उथप्पा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.सोशल मीडियावर त्याने आपल्या पत्नीचा बेबी बंप फोटोशुट शेअर केला होता. य़ा फोटोमध्ये रॉबिन उथप्पा त्याची पत्नी आणि मुलाने पोझ दिली होती. त्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला होता.
फोटोत काय?
सध्या केरळकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका नवजात मुलीला आपल्या मांडीवर घेऊन उभा आहे. फोटोत त्याचा ५ वर्षाचा मुलगा आणि पत्नी शीतलही दिसत आहेत. रॉबिन उथप्पाने चिमुकलीचे स्वागत करताना तिचे नावही सांगितले आहे. त्याने आपल्या मुलीचे नाव ट्रिनिटी उथप्पा ठेवले आहे.
रॉबिन उथप्पाने भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास २६ च्या सरासरीने एकूण ९३४ धावा केल्या आहेत, तर टी-२० मध्ये त्याच्या नावावर २४९ धावा आहेत.
आयपीएल 2022 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या रॉबिन उथप्पाने 12 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 134.50 च्या स्ट्राइक रेटने एकूण 230 धावा केल्या आहेत.