आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची 15 वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

रोहित शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे तो पाचव्या कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे.

Updated: Jun 23, 2022, 01:34 PM IST
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची 15 वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला... title=

मुंबई: 35 वर्षीय रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 जून रोजी रोहित शर्मा आयर्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. रोहित शर्माने तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. रोहित शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे तो पाचव्या कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना एजबॅस्टन येथे 1 ते 5 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. या पाचवा सामना अनिर्णित राहिला किंवा विजय मिळवला तर कसोटी मालिका भारताच्या खिशात जाईल.

रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 15र्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. रोहितने ट्विटरवर लिहिले की, 'भारतीय संघात पदार्पण केल्यापासून आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण करत आहे. हा एक असा प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपत राहीन.'' रोहित पुढे म्हणाला, ''या ​​प्रवासाचा भाग असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. इथवर पोहोचण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्यांचे विशेष आभार. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि समीक्षकांचे आभार मानतो. संघासाठी तुमचे प्रेम आणि समर्थन हेच ​​आम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करते.'

रोहित शर्माने आतापर्यंत 45 कसोटी, 230 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 9283, कसोटीत 3137 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3313 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर कसोटीत 8, एकदिवसीय सामन्यात 29 आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 शतकं आहेत.