नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी

 नाशिक महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपची बाजी 

Updated: Nov 22, 2019, 02:00 PM IST
नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी title=

नाशिक : नाशिक महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. महाविकासआघाडीचा नाशिक प्रयोग फसला आहे. भाजपच्या सतीश कुलकर्णींची महापौरपदी निवड झाली आहे. राज्यात शिवसेनेने आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर त्याचा थेट परिणाम नाशिक महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता होती. महाशिवआघाडीचा महापौर निवडून आणण्यासाठी हालचाली सुरु होती.  सहा नगरसेवक गायब असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती.

नाशिकच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेत रस्सीखेच होती. भाजपकडून महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदासाठी भिकुबाई बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण नाशिकच्या महापौर निवडणूकीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा भाजपचे फुटीर नगरसेवक परत भाजपच्या तंबूत परतले. त्यामुळे भाजपचा महापौर होणाची शक्यता वाढली होती. सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने फुटीर नगरसेवक परतल्याचा फुटीर नगरसेवकांचा दावा केला आहे. 

भाजपचे सतीश कुलकर्णी यांची नाशिकच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली. संख्याबळ जुळत नसल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणुकीतून माघार घेण्यात आली. कुलकर्णी यांच्या विरोधात भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले. त्यामुळे नाशिक महाशिवआघाडीत फूट पडल्याची चर्चा होती.

आपल्या उर्वरित नगरसेवकांना सहलीला पाठवण्याची नामुष्की भाजपवर आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचा-भाजपशी असलेला संसार मोडून सेनेने आघाडीच्या पक्षांशी मिळवलेला सूर राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेंमध्ये देखील अडचणीचा ठरला होता. पण भाजप महापौरपदी कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आता महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुकांमध्ये रंगताना दिसतोय. त्यामुळे नाशिकच्या महापौर पदाची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली होती.