IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी 20 लीगच्या नव्या सीजनची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे. यंदा अनेक नवे आणि जुने खेळाडू आपापल्या संघांसाठी मैदानात गाजवण्याकरता उतरतील. क्रीडा क्षेत्रामध्ये एका खेळाडूला झालेली दुखापत दुसऱ्या खेळाडूसाठी वरदान ठरत असते. ही गोष्ट आयपीएलमध्ये पुन्हा एकदा खरी होताना दिसतेय. यंदा काही खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त असल्याने त्यांना आयपीएल 2025 (IPL 2025) मधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या काही स्टार खेळाडूंना मागच्या दाराने आयपीएल 2025 मध्ये येण्याची संधी मिळू शकते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संघाचा भाग असणारे आणि यापूर्वी आयपीएलचं मैदान गाजवलेले पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर या खेळाडूंची आयपीएल 2025 मध्ये मागच्या दाराने एंट्री होऊ शकते. पृथ्वी शॉ मागच्यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. मात्र त्याचा परफॉर्मन्स ठीक नसल्यामुळे त्याला मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिटेन करण्यात आलं नाही. त्यानंतर आयपीएल 2025 च्या ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉने स्वतःला 75 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर लिस्ट करून सुद्धा त्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तशीच काहीशी परिस्थिती शार्दूल ठाकूरची सुद्धा झाली. चेन्नईने रिटेन न केल्याने तो ऑक्शनमध्ये आला आणि कोणत्याही संघाने खरेदी न केल्याने अनसोल्ड ठरला. मात्र या दोघांनी इतर खेळाडूंच्या दुखापतींमुळे आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
हेही वाचा : MI VS CSK मॅच स्टेडियममध्ये जाऊन पाहायचीये? मग जाणून घ्या बुकिंग डिटेल्स आणि तिकीटांच्या किंमती
दिल्ली कॅपिटल्सने निवडलेला इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रुक याने आयपीएल 2025 मधून त्याचे नाव परत घेतले. त्यामुळे दिल्ली संघात एका फलंदाजांची जागा शिल्लक असून त्या जागेवर पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. लखनऊ सुपर जाएंट्स संघातील काही गोलंदाज सध्या दुखापतग्रस्त असल्याने शार्दूल ठाकूर आणि शिवम मावी यांना संधी मिळू शकते. शार्दूल ठाकूर हा काही दिवसांपासून लखनऊच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे त्याला आयपीएल 2025 मध्ये लखनऊ संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते असं बोललं जातंय. मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही.
लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाचे तीन गोलंदाज मयंक यादव, मोहसीन खान आणि आवेश खान दुखापतग्रस्त आहेत. हे तिघेही सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन करत आहेत. लखनऊचा पहिला सामना २४ मार्च रोजी आहे. जर हे स्टार गोलंदाज यापूर्वी फिट झाले नाहीत तर शार्दूल ठाकूरसाठी लखनऊ संघाचे दरवाजे उघडू शकतात.