)
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मधील सहावा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) हा काही वेळातच सुरु होणार आहे. जेव्हा जेव्हा भारत - पाकिस्तान संघ क्रिकेटच्या मैदानात येतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे असतं. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. सामन्याला होणारा विरोध आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुबई पोलिसांनी आणि इवेंट सिक्योरिटी कमेटीने स्टेडियम परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय. त्यामुळे चाहत्यांना काही कठोर नियमांचं पालन करावं लागणार असून हे नियम मोडल्यास त्यांना तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो.
पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 26 हिंदूंना जीवे मारलं होतं, त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर सुद्धा हाती घेतलं ज्यात देशासाठी काही सैनिकांनी सुद्धा आपले प्राण गमावले. त्यामुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी अनेक लोकांकडून केली जातेय. आशिया कपमध्ये होत असलेल्या भारत - पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी याबाबत आंदोलन सुद्धा करण्यात आली. तेव्हा परिस्थिती पाहता सामना सुरु असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुबई पोलिसांनी स्टेडियम परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलाय.
दुबई पोलिसांचे सहाय्यक कमांडर-इन-चीफ ऑफ ऑपरेशन्स आणि ईएलसीचे प्रमुख मेजर जनरल सैफ मुहैर अल मजरोई म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यासाठी विशेष युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका असल्यास, त्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. क्रीडा सुविधा आणि कार्यक्रमांच्या सुरक्षिततेवरील संघीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
परवानगीशिवाय मैदानात प्रवेश करणे किंवा प्रतिबंधित वस्तू (फटाके, ज्वलनशील पदार्थ, लेझर, छत्री, मोठे कॅमेरे, सेल्फी स्टिक, धारदार वस्तू, विषारी पदार्थ, झेंडे, बॅनर, पाळीव प्राणी, रिमोट-कंट्रोल्ड उपकरणे, सायकली, स्कूटर, स्केटबोर्ड आणि काचेपासून बनवलेल्या कोणत्याही आणणे असे प्रकार केल्यास 1 ते 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. सोबतच मोठा दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. दंडाची रक्कम ही 5000 द्राम (भारतीय चलनात 1.2 लाख / पाकिस्तानी चलनात 3,82,708 रुपये) ते 30000 द्राम (भारतीय चलनात 7.2 लाख/ पाकिस्तानी चलनात 22,96,249 रुपये) पर्यंत असू शकतो.
14 सप्टेंबर रोजी होणारा सामान हा भारत - पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे भारताने 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध सामना खेळला यात त्यांनी 9 विकेटने विजय मिळवला. तर पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी विजय मिळवला. भारत पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये असून सध्या त्या दोघांचेही एक - एक पॉईंट्स झाले आहेत. आता जो संघ रविवारचा सामना जिंकेल त्यांचे सुपर 4 मध्ये पोहोचण्याचे चान्सेस वाढतील.
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे होणार आहे?
हा सामना रविवार, 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामन्याची सुरुवात संध्याकाळी 8:00 वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल.
स्टेडियममध्ये कोणत्या वस्तू प्रतिबंधित आहेत?
प्रतिबंधित वस्तू: फटाके, ज्वलनशील पदार्थ, लेझर पॉइंटर, छत्र्या, मोठे कॅमेरे, सेल्फी स्टिक, धारदार वस्तू, विषारी पदार्थ, झेंडे, बॅनर, पाळीव प्राणी, रिमोट-कंट्रोल्ड उपकरणे, सायकली, स्कूटर, स्केटबोर्ड, काचेच्या बाटल्या किंवा वस्तू, पॉवर बँक, धूम्रपान साहित्य, बाहेरील अन्न/पेये आणि मोठे झेंडे/बॅनर.
सामन्याच्या सुरक्षेसाठी इतर काय उपाययोजना आहेत?
चाहत्यांना सामन्यापूर्वी 3 तास आधी पोहोचण्याचा, एकदाच प्रवेश घेण्याचा, परवानगीशिवाय पार्किंग टाळण्याचा आणि रस्ते अडवू नये असा सल्ला देण्यात आला आहे. दुबई पोलिसांनी स्टेडियम परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत