चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) बक्षीस म्हणून 58 कोटींची रोख रक्कम जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) सर्व खेळाडूंना प्रत्येकी 3 कोटी मिळणार आहेत. बीसीसीआय सचिवांना सांगितल्यानुसार, सहाय्यक परीक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 50 लाख तर बीसीसीआय अधिकाऱ्यांना 25 लाख मिळणार आहेत. दरम्यान लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी गौतम गंभीर राहुल द्रविडप्रमाणे सर्वांसमोर उदाहरण उभं करणार का? अशी विचारणा केली आहे. टी-20 वर्ल्डकप विजयानंतर राहुल द्रविडने आपल्या सपोर्ट स्टाफपेक्षा जास्त रक्कम घेण्यास नकार दिला होता. गौतम गंभीरने मात्र अद्याप असं कोणतं विधान केलेलं नाही.
"आयसीसी टी-20 वर्ल्डकप विजयानंतर बोर्डाने रोख रकमेचं बक्षीस जाहीर केलं होतं. यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या सहकारी, कोचिंग स्टाफपेक्षा जास्त रक्कम घेण्यास नकार दिला होता. त्याने रक्कम सहकाऱ्यांसह समान वाटून घेतली होती," असं गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारमधील लेखात लिहिलं आहे.
"बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीची बक्षिसं जाहीर करून 15 दिवस झाले आहेत, परंतु सध्याच्या प्रशिक्षकांनी आपणही राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याचं अद्याप काही सांगितेलं नाही. किंवा या प्रकरणात द्रविड एक चांगला आदर्श नाही?" असंही ते पुढे म्हणाले.
सुनील गावसकर यांनी यावेळी क्रिकेटर्सना बक्षीस दिल्याबद्दल बीसीसीआयचं कौतुकही केलं. "आपल्या खेळाडूंनी चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्याननंतर बीसीसीआयने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीसीठी 58 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. गतवर्षी टी-20 वर्ल्डकप विजयानंतर बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं," असं त्यांनी सांगितलं.
"हे खरोखरच विलक्षण आहे, कारण आता भरघोस निधी मिळत असलेलं बोर्ड सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहे आणि त्यांना उदार हस्ते बक्षीस देत आहे. बीसीसीआय खेळाडूंना आयसीसीने विजेत्यांसाठी जाहीर केलेली बक्षीस रक्कम देखील ठेवू देत आहे, जी प्रत्येकासाठी चांगली रक्कम आहे," असंही ते पुढे म्हणाले.