अनोळखी क्रिकेटपटूचा T20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड! एकट्यानेच 7 विकेट्स घेतल्या; समोरची टीम 23 धावांत तंबूत
Best Bowling Figures In T-20: तो गोलंदाजीला आला तेव्हा समोरच्या संघातील सलामीवीरच मैदानात जम बसवून खेळत होते. त्याच्या 4 ओव्हर संपल्या तेव्हा त्याच्या एकट्याच्या नावावर 7 विकेट्स होत्या. हे सात खेळाडू क्लिन बोल्ड झाले हे ही विशेष.
Best Bowling Figures In T-20: टी-20 क्रिकेटमधील फलंदाजीसंदर्भातील अनेक विक्रम तुम्हाला ठाऊक असतील. पण सर्वोत्तम रेकॉर्ड असलेला टी-20 गोलंदाज कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वर फोटोत दिसणारी व्यक्ती ही टी-20 मधील सर्वोत्तम गोलंदाज आहे असं म्हणता येईल. कारण या व्यक्तीने कामगिरीच असी केलीय. अर्थात हा चेहरा तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी पहिल्यांदाच पाहिला असेल. तर फोटो दिसणारा का विक्रमवीर आहे मलेशियाचा वेगवान गोलंदाज सियाजरुल इद्रुस (Malaysia's Syazrul Idrus). सियाजरुलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. टी-20 च्या सामन्यात 7 विकेट्स घेणारा सियाजरुल हा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा प्रकार कोणालाही करता आलेला नाही.
पूर्वी हा पराक्रम कोणाच्या नावे होता?
टी-20 वर्ल्डकपच्या आशिया-ब क्वालिफायर सामन्यामध्ये चीनविरुद्ध खेळताना सियाजरुलने हा विक्रम नोंदवला. सियाजरुलने चीनच्या 7 ही फलंदाजांना क्लिन बोल्ड केलं. ही टी-20 मध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. सियाजरुलने पीटर अहोचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी हा विक्रम नायझेरियाच्या अहोच्या नावाने होता. त्याने 2021 मध्ये सियारा लियोनविरुद्ध 5 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीयाचाही समावेश
आयसीसीचे पूर्णवेळ सदस्य असलेल्या देशांबद्दल बोलायचं झाल्यास टी-20 सामन्यांमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम एका भारतीय गोलंदाजाच्या नावावर आहे. या गोलंदाजाचं नाव आहे दीपक चाहर. दीपकने बांगलादेशविरुद्ध 2019 साली खेळलेल्या सामन्यामध्ये 7 धावा देऊन 6 गड्यांना तंबूत पाठवलं होतं. युगांडाच्या दिनेश नाकरानीने लेसोथेविरुद्ध 2021 साली झालेल्या सामन्यात 7 धावा देऊन 6 गड्यांना बाद केलेलं.
मलेशिया विरुद्ध चीन सामन्यात काय घडलं?
सियाजरुलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर मलेशिया विरुद्ध चीन सामन्यात तो स्टार गोलंदाज ठरला. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून चीनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये चीनने बिनबार 12 धावा केल्या. मात्र सियाजरुल गोलंदाजील आल्यानंतर सामन्याचं चित्र पालटलं. त्याने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर वांग लियुयांगला बाद केलं. या ओव्हरमध्ये सियाजरुलने एकूण 3 विकेट्स घेतल्या. पुढच्या ओव्हरमध्ये त्याने आणखीन 2 विकेट्स घेत 5 विकेट्सचा टप्पा गाठला. नंतर त्याने अजून 2 विकेट्स घेतल्या. सियाजरुलची शेवटची ओव्हर निर्धाव ठरली.
आपल्या 4 ओव्हरमध्ये सियाजरुलने 8 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या. त्याने एक निर्धाव ओव्हर टाकली. या कामगिरीमुळे चीनचा संपूर्ण संघ 23 धावांमध्ये तंबूत परतला. मलेशियाने 24 धावांचं लक्ष्य 2 विकेट्सच्या मोबदल्यात अवघ्या 4.5 ओव्हर्समध्ये गाठलं.