सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि भारतातली चौथी आणि शेवटची टेस्ट अनिर्णित राहिली. यामुळे भारतानं ४ टेस्ट मॅचची ही सीरिज २-१नं जिंकली. ७१ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियातला भारताचा हा पहिलाच मालिका विजय आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत टेस्ट सीरिज जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश आहे. सिडनी टेस्टच्या शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नसल्यामुळे शेवटची टेस्ट अनिर्णित राहिली आणि भारतानं ही टेस्ट सीरिज खिशात टाकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहली एँड कंपनीनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धुळ चारल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. विजयानंतर भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रुम आणि मैदानात एकच जल्लोष केला.


सिडनीमधली टेस्ट संपल्यानंतर भारतीय टीम हॉटेलमध्ये परत आली तेव्हा त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली होती. भारतीय टीमचे प्रशंसक हॉटेलमध्ये बॅण्ड-बाजा घेऊन आणि नाच-गाणी करत स्वागतासाठी तयार होते. हॉटेलमध्ये सगळ्यात आधी कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचं आगमन झालं. या दोघांच्या आगमनावेळी 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' हे गाणं सुरु होतं. विराट कोहलीनं हॉटेलच्या गेटवरच खिशातून मोबाईल काढला आणि शूटिंग घ्यायला सुरुवात केली. शूटिंग करतानाच विराट कोहली थिरकतही होता. यानंतर हार्दिक पांड्यानं नाचायला सुरुवात केली आणि भारतीय टीमही या जल्लोषात सहभागी झाली. 



मैदानातही भारतीय टीमचं सेलिब्रेशन



त्याआधी सीरिज जिंकल्यानंतर मैदानातही भारतीय टीमनं जोरदार सेलिब्रेशन केलं. भारतीय टीमनं वेगळ्या अंदाजामध्येच मैदानात विजयाचा आनंद लुटला. नाच-गाण्यांपासून नेहमी लांब असलेला चेतेश्वर पुजारानंही मैदानात नाचायचा प्रयत्न केला. विराट कोहली आणि ऋषभ पंतनं पुजाराला नाच शिकवायला मदत केली.