राहुल, पंतने कमावलं आणि शेपटाने गमावलं, टीम इंडिया 364 धावांवर ऑल आऊट

राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया 364 धावांवर ऑल आउट झाली. 

पुजा पवार | Updated: Jun 23, 2025, 10:46 PM IST
राहुल, पंतने कमावलं आणि शेपटाने गमावलं, टीम इंडिया 364 धावांवर ऑल आऊट
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. सोमवारी 23 जून रोजी या सामन्याचा चौथा दिवस असून यादिवशी भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली. 

राहुल, पंतची शतकीय खेळी : 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात सामना खेळवला जात आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी कमालीची खेळी करून स्कोअर बोर्डवर तब्बल 471 धावसंख्या केली. यात भारताकडून यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक ठोकले. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी 465 धावांवर ऑल आउट केले. ज्यामुळे भारताने 6 धावांनी आघाडी घेऊन फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. यावेळी सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक ठोकलं. केएल राहुलने 202 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. राहुलनंतर इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या इंनिंगमध्ये पुन्हा दमदार फलंदाजी करून ऋषभ पंतने शतक ठोकलं. त्याने 130 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. 

टीम इंडियाची फलंदाजी गडगडली : 

ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी भारतासाठी फलंदाजीत चांगली पार्टनरशिप केली. दोघांनी जवळपास 245 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाचे उर्वरित फलंदाज पुढे अशीच कामगिरी कायम ठेवतील अशी अपेक्षा असताना पंतच्या विकेटनंतर भारताची फलंदाजी गडगडली. पंटनंतर आलेला करुण नायर 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर 91 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडने भारताच्या तीन विकेट घेतल्या ज्यात शार्दूल ठाकूर, बुमराह आणि सिराजचा समावेश होता. त्यानंतर रवींद्र जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसिद्ध कृष्णाची दहावी विकेट गेल्यामुळे जडेजा 25 धावांवर नाबाद राहिला. परिणामी टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं. 

हेही वाचा : ऋषभ पंतने रचला इतिहास, टेस्टमध्ये अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला विकेटकिपर

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर