India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशच्या संघादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असतानाच टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ शनिवारी रात्री जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघातील काही खेळाडूंच्या समावेशाबद्दल जितकं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याहून अधिक आश्चर्य वगळण्यात आलेल्या खेळाडूंबद्दल व्यक्त केल जात आहे. 


हैदराबादचा दमदार फलंदाज पहिल्यांदाच भारतीय संघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या खेळाडूला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. नितीश कुमार रेड्डीने हैदराबादच्या संघाकडून खेळताना आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी केली होती. नितीश कुमार रेड्डीबरोबर मयंक यादवलाही संघात स्थान देण्यात आलं आहे.


मयांक यादवला पहिल्यांदाच संधी


बांगलादेशविरूद्ध टी-20 मालिकेसाठी मयांक यादवला संधी मिळण्यामागेही आयपीएल 2024 मध्ये त्याने केलेली कामगिरीच कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मयंकने ताशी 150 किमी प्रति तासहून अधिक वेगाने चेंडू टाकला होता. मयांक यादवने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. मात्र ऐन फॉर्मात असताना दुखापतीमुळे तो आयपीएलचं पर्व अर्धवट सोडून गेला. तो दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता, पण त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर आणि अनोख्या शैलीमुळे भारतीय संघात स्थान मिळवलं आहे.


नक्की वाचा >> Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर


या दोघांचे पुनरागमन


गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघात कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. या मालिकेसाठी संघ निवड पाहिल्यास त्याचा प्रत्यय येताना दिसतो. कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरूण चक्रवर्तीला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले असून पर्यायी यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.


या खेळाडूंना विश्रांती


बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका भारताला खेळायची असल्याने पंतला विश्रांती देण्यात आल्याचे समजते. जसप्रीत बुमराह, यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करुन आगामी कसोटी मालिका खेळवण्याच्या दृष्टीने या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने टी-20 मधून निवृत्ती घेतल्याने त्यांचा विचार झाला नाही.


बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:


सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव.



यांना संधीच नाही


ज्या खेळाडूंना उत्तम कामगिरीनंतरही वगळण्यात आलं आहे त्यामध्ये ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.