R Ashwin : भारताचा माजी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R Ashwin) हा सध्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळत असून यातील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बाद दिल्यामुळे अश्विनने महिला अंपायरवर राग काढत मैदानात आदळआपट केली. त्यानंतर आता अश्विनला मॅच रेफरीने शिक्षा ठोठावली आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबजला सांगितले की, 'आर अश्विनला अंपायरच्या निर्णयावर असहमति दाखवल्याबद्दल मॅच फीच्या 10 टक्के आणि उपकरणांचा दुरुपयोग केल्याबद्दल मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आर अश्विनने त्याची चूक मान्य करून शिक्षा स्वीकारली आहे'.
8 जून रोजी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रैगन्स आणि आईड्रीम तिरुप्पुरत मिलियंस यांच्यात सामना पार पडला. यावेळी अंपायरने आउट दिल्यावर अश्विन भडकला. अश्विन या सामन्यात डिंडीगुल ड्रैगन्सकडून खेळत होता. सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये स्पिनर आर साई किशोरच्या बॉलवर अश्विनला बाद घोषित करण्यात आले. त्यांच्या संघाकडे अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी डीआरएस सुद्धा नव्हता. अश्विनने 10 बॉलवर दोन चौकार आणि एक षटकार मारून 18 धावांची कामगिरी केली होती. अश्विनने पाचव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॉल त्याचा पायावर जाऊन लागला. महिला अंपायर वेंकटेशन कृतिकाने गोलंदाजीने केलेल्या अपीलवर आउट देण्यासाठी बोट वर केले कारण अश्विन वेगाने धाव घेण्यासाठी पळत होता.
हेही वाचा : आयसीसी हॉल ऑफ ऑफ फेममध्ये MS Dhoni चा समावेश, यापूर्वी भारताच्या कोणत्या क्रिकेटर्सना मिळाला हा सन्मान?
Ashwin loses his cool after a tight LBW call TNPL2025 Ashwin pic.twitter.com/kJHVzXWrjE
— FanCode (FanCode) June 9, 2025
रिप्लेमधून हे स्पष्ट झालं की बॉल हा लेग स्टंपच्या बाहेर पिच होत होता. पण अश्विन डीआरएस घेऊ शकत नव्हता कारण त्याने आणि त्याच्या सलामी जोडीदार शिवम सिंहने यापूर्वीच दोन डीआरएस घेऊन त्याचा कोटा पूर्ण केला होता. त्यामुळे डीआरएस शिल्लक नसल्याने आर अश्विनला अंपायरने दिलेला निर्णय मान्य करून बाहेर जाण्याऐवजी पर्याय नव्हता.
आर अश्विन बाद झाल्यावर खूप रागात दिसला आणि त्याने महिला अंपायरशी या निर्णयावरून वाद घातला. मात्र अंपायरने तिचा निर्णय न बदलल्याने अश्विन रागात मैदानाबाहेर जाण्यास निघाला. यावेळी त्याने प्रथम त्याची बॅट लेग गार्डवर मारली आणि मग तो सीमारेषेच्याजवळ पोहोचला तेव्हा त्याने आपला ग्लव्स काढून फेकला. आर अश्विनच्या संघ नऊ विकेटने या सामन्यात पराभूत झाला.