दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर विजय माल्याने RCB वर केला कौतुकाचा वर्षाव, पण विराटचं....

IPL 2025 : आरसीबीच्या या विजयानंतर आरसीबीचे जुने मालक विजय माल्या याने सर्व खेळाडूंचं अभिनंदन करून संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

पुजा पवार | Updated: Apr 28, 2025, 04:27 PM IST
दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर विजय माल्याने RCB वर केला कौतुकाचा वर्षाव, पण विराटचं....
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : आयपीएल 2025 (IPL 2025) मधील 46 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB VS DC) यांच्यात पार पडला.  दिल्ली कॅपिटल्सचं होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबीने 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह आरसीबी ही पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थानावर पोहोचली. यासह चालू सीजनमध्ये सर्वाधिक धावा फलंदाज आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज सुद्धा आरसीबीचाच असल्याने ऑरेंज आणि पर्पल कॅप सुद्धा आरसीबीच्या खेळाडूंकडे आहे. आरसीबीच्या या विजयानंतर आरसीबीचे जुने मालक विजय माल्या याने सर्व खेळाडूंचं अभिनंदन करून संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यात रविवारी आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करून 8 विकेट गमावून 162 धावा केल्या. तर आरसीबीला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान आरसीबीच्या फलंदाजांनी 18.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे जुने मालक विजय माल्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने फक्त 36 शब्दांत आरसीबीचे अभिनंदन केले. मात्र संपूर्ण पोस्टमध्ये त्याने विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला नाही. 

काय म्हणाला विजय माल्या?

रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर आरसीबीने विजय मिळवल्यावर विजय मल्ल्याने सोशल मीडियावर पोस्ट करून संघाचे कौतुक केले. त्याने यात म्हटले की, 'दिल्ली कॅपिटल्सवर जबरदस्त विजय मिळवल्याबद्दल आरसीबीचे अभिनंदन. सलग 6 विजय मिळवले. आयपीएलमध्ये आता रेकॉर्ड बनणार आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्ही टीमसाठी एक बोनस आहेत. आतापर्यंतचे यश आश्चर्यकारक आहे.असाच हिंमतीने खेळत राहा. विजय माल्याने वेगवेगळ्या बँकांकडून 9000 कोटींचं लोन घेतलं होतं. पण हे लोन फेडल्याशिवायचं 2016 मध्ये विजय माल्या भारत सोडून पळाला. तेव्हा पासून आरसीबीने  विजय माल्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. 

हेही वाचा : हे माझं मैदान! विजयानंतर विराटने केएल राहुलला दिलं जशास तसं उत्तर, Video Viral

आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी : 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थानावर आहेत. त्यांनी 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.521 असा असून सध्या त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स असून त्यांचा नेट रनरेट +1.104 आहेत. तर तिसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स असून त्यांचा नेट रनरेट हा +0.889 असा आहे.