Virat Kohli On Retirement: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांना एकच धाकधूक लागून राहिली होती. विजयानंतर भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी असलेला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांपैकी कोणीतरी निवृत्ती जाहीर करेल की काय असं वाटत होतं. मात्र दोघांनी असं काहीही केलं नसलं तरी विराट कोहलीने सामन्यानंतर निवृत्तीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.
सामन्यानंतर सायमन डलशी बोलताना विराट कोहलीने आम्ही निघून गेल्यानंतर सध्याचे नव्या दमाचे खेळाडू देशासाठी असेच सामने जिंकत राहतील असं आपल्याला वाटत असल्याचं सांगितलं. प्रश्न विचारण्याआधी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज असलेल्या सायमनने विराट कोहलीला तू नक्कीच निवृत्त होण्याआधी एखाद्या सक्षम व्यक्तीच्या हातीच फलंदाजीची धुरा सोपवशील असं म्हटलं होतं.
निवृत्तीचा उल्लेख करत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विराटने, "होय नक्कीच, म्हणजे मला वाटतं की जसं शुभमनने सांगितलं त्याप्रमाणे मी सतत या खेळाडूंबरोबर जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांच्यासोबत माझे अनुभव शेअर करतो. मी इतका दिर्घकाळ कसा खेळू शकलो हे सांगतो. त्यांच्या खेळात सुधारणा होण्यासाठी मी शक्य असेल तिथे पुढाकार घेऊन मदत करतो. ते म्हणतात ना, सारं काही तुम्ही सोडून जाताना तुम्हाला गोष्टी योग्य ठिकाणी असलेल्या अवस्थेतच सोडून जाणं जास्त योग्य वाटतं, तासाच हा प्रकार आहे," असं म्हटलं.
"यासाठीच आमचे सतत प्रयत्न सुरु असतात, आम्ही याचसाठी प्रयत्न करत असतो की एखद्या ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं किंवा आमच्यातील खेळ संपला तर आपल्याकडे एक चांगला संघ असावा जो पुढील 8 ते 10 वर्षांसाठी धुरा संभाळू शकेल आणि या मुलांमध्ये खरोखरच इतकं टॅलेंट आहे की ते हे करु शकतात. त्यांना खेळाच्या परिस्थितीबद्दल बऱ्यापैकी जाण असते. यापूर्वीच त्यांनी पुढाकार घेऊन अनेक परिणामकारक खेळी केल्याचं पाहायला मिळालं आहे. श्रेयस उत्तम खेळला, के. एल. राहुल फिनिशरची भूमिका बजावतोय तर हार्दिक मॅच विनर आहे," असं विराट सध्याच्या संघाचं कौतुक करताना म्हणाला.