'मला खोलीत एकटं उदास बसायचं नाही', कुटुंबाबाबत BCCI च्या नव्या नियमामुळे विराट कोहली नाराज

Virat Kohli :  बॉर्डर गावसकर स्ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजमध्ये भारताचा 1-3  ने दारुण पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी सुद्धा हुकली. त्यानंतर बीसीसीआयकडून खेळाडूंसंदर्भात अनेक नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या. 

पुजा पवार | Updated: Mar 16, 2025, 06:25 PM IST
'मला खोलीत एकटं उदास बसायचं नाही', कुटुंबाबाबत BCCI च्या नव्या नियमामुळे विराट कोहली नाराज
(Photo Credit : Social Media)

Virat Kohli : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावसकर स्ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजमध्ये भारताचा 1-3  ने दारुण पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी सुद्धा हुकली. त्यानंतर बीसीसीआयकडून खेळाडूंसंदर्भात अनेक नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या. यानंतर आता 45 दिवसांपेक्षा जास्त टीम इंडिया (Team India) कोणत्या दौऱ्यावर असली तर त्यांच्या कुटुंबाला केवळ 14 दिवस खेळाडूंसोबत राहता येणार आहे. तर छोट्या दौऱ्यात खेळाडूंच्या पत्नी, मुलं, गर्लफ्रेंड इत्यादी जास्तीत जास्त एक आठवडा खेळाडूंसोबत दौऱ्यावर राहू शकतात. मात्र बीसीसीआयने कुटुंबाबाबत घेतलेल्या निर्णयावर उत्तर देताना या निर्णयाबाबत विराट कोहलीचा (Virat Kohli) नाराजीचा सूर दिसला. 

कुटुंब खूप महत्वाचं आहे : 

विराट कोहलीने बीसीसीआयने घातलेल्या नव्या नियमांबाबत आपलं मत मांडलं. शनिवारी बंगळुरू येथील आरसीबीच्या इनोवेशन लॅब या संमेलनात कोहलीने एका प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, 'लोकांना कुटुंबाचं महत्व सांगणं खूप अवघड आहे. प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही तणावात असतात तेव्हा कुटुंबाच्या जवळपास असणं खूप महत्वाचं असतं. मला वाटत नाही की लोकांना याचं महत्त्व समजलं आहे'.

स्वखर्चाने दुबईत पोहोचले खेळाडूंचे कुटुंबीय : 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची फायनल दुबईत पार पडली. दुबईत पार पडलेल्या स्पर्धेत भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. यावेळी हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी इत्यादी खेळाडूंचं कुटुंब स्वखर्चाने दुबईला आलं होतं. यावेळी कुटुंब टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथे न थांबता दुसऱ्या हॉटेलमध्ये त्यांनी आपली राहण्याची व्यवस्था केली होती. कुटुंबाचा कोणताही खर्च बीसीसीआयने उचलला नव्हता. 

हेही वाचा : IPL 2025 ऑक्शनमध्ये Unsold ठरलेल्या मराठमोळ्या क्रिकेटरला मिळाली नवीन टीम? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

 

'मला खोलीत उदास बसायचं नाही' : 

विराट कोहलीने मुलाखतीत म्हटले की, कुटुंब जवळपास असल्याने खेळाडूंना मैदानातील निराशेतून लवकर उभारी मिळण्यास मदत होते. मी माझ्या खोलीत एकटा जाऊन उदास बसू इच्छित नाही. मला सामान्य व्हायचे आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या खेळाला एका जबाबदारीप्रमाणे समजू शकता. 

मी कुटुंबासोबत राहण्याची संधी सोडत नाही : 

कोहलीने म्हटले की, 'आपण बाहेर आपली वचनबद्धता पूर्ण करतो आणि मग आपण घरी परत येतो, तुम्ही जेव्हा कुटुंबासोबत असता तेव्हा तुमच्या घरातील वातावरण अतिशय सामान्य असते. त्यामुळे माझ्यासाठी तो दिवस खूप आनंदाचा असतो. त्यामुळे जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी कुटुंबासोबत बाहेर जाण्याची किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी सोडत नाही'. 

'माझी खूप निराशा झाली' : 

विराट म्हणाला की, 'मला या निर्णयामुळे खूप निराशा वाटली कारण ज्यांचं याबाबतीत काही देणंघेणं नव्हतं अशांना सुद्धा या चर्चेत सामील करण्यात आलं. ज्यांनी म्हटले, 'ओह कदाचित खेळाडूंना त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवायला हवं'. जर तुम्ही कोणाही खेळाडूला विचारलं की तुम्हाला तुमचं कुटुंब तुमच्या सोबत हवंय का? तर सर्व खेळाडू होत म्हणतील.