IPL 2025 मध्ये धावांचा कहर करणाऱ्या 29 वर्षीय खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Nicholas Pooran Retirement : काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 मध्ये 500 हून अधिक धावा करणारा निकोलस पुरनने वयाच्या 29 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. निकोलसच्या या तडकाफडकी निवृत्तीमुळे त्याचे फॅन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. 

पुजा पवार | Updated: Jun 10, 2025, 12:25 PM IST
IPL 2025 मध्ये धावांचा कहर करणाऱ्या 29 वर्षीय खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
(Photo Credit : Social Media)

Nicholas Pooran Retirement : मागील काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यात आता वेस्ट इंडिजचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज निकोलस पुरन याचा देखील समावेश झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 मध्ये 500 हून अधिक धावा करणारा निकोलस पुरनने (Nicholas Pooran) वयाच्या 29 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. निकोलसच्या या तडकाफडकी निवृत्तीमुळे त्याचे फॅन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. 

क्रिकेटर निकोलस पूरन याने स्वत: इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट करत या निर्णयाची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. यासह विंडीज क्रिकेट टीमकडून सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अनेक क्रिकेटर्सनी निकोलस पूरनला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.  मे महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दिग्गज क्रिकेटर्सनी देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर गेल्या आठवड्यात साऊथ आफ्रिकेचा क्रिकेटर हेन्रीचं क्लासेन, भारताचा गोलंदाज पीयूष चावलाने सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने देखील वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 

हेही वाचा : BCCI ला रोहित शर्मा नकोसा झालाय? लवकरच ODI चं कर्णधारपदही काढणार; आगरकरचा मास्टर प्लॅन?

काय म्हणाला निकोलस पूरन?

निकोलस पूरनने सोशल मीडियावर एक लांब लचक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, 'मी फार विचार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळावर आपण प्रेम करतो, त्याने आपल्याला खूप काही दिलंय आणि देत राहिल. या खेळाने आनंद, अनेक आठवणी आणि वेस्ट इंडीजचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मरुन रंगाची जर्सी परिधान करुन राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि मैदानात पाय ठेवता आपलं सर्वस्व देणं…. शब्दात व्यक्त होणं अवघड आहे की क्रिकेट माझ्यासाठी वास्तवात किती महत्त्वपूर्ण आहे'. 

पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्व करताना म्हणाला की, 'कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणं हा एक सन्मान आहे. हा सन्मान कायम माझ्या मनात राहिल. चाहत्यांचं अतूट प्रेमासाठी आभार. मला तुम्ही कठीण काळात साथ दिली आणि चांगले क्षण अतुलनीय उत्साहाने साजरे केले. माझ्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल माझे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार. तुमचा विश्वास आणि पाठिंब्याने मला या सर्व परिस्थितीतून पुढे जाण्यास मदत झाली'. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

निकोलस पूरनची क्रिकेट कारकीर्द : 

निकोलस पूरनने टी 20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं. पूरनने 106 टी 20 सामन्यांमध्ये 135.40 च्या स्ट्राईक रेटने आणि 26.15 च्या सरासरीने 2275 धावा केल्या. यात त्याने 13 अर्धशतकं झळकावली. तर 61 वनडे सामन्यांमध्ये 99.15 च्या स्ट्राईक रेटने 1983 धावा केल्या. निकोलसने या दरम्यान 3 शतकं आणि 11 अर्धशतकं झळाकावली.