भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील सर्व सामने दुबईत खेळल्याने वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू अँडी रॉबर्ट्स (Andy Roberts) यांनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तान यजमान असतानाही भारताने आपले सर्व सामने दुबईत खेळले. केंद्र सरकारने पाकिस्तानला जाण्याची परवानगी न दिल्याने दुबईत सामने खेळल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं.
भारताविरोधातील सामने दुबईत खेळवले जात असल्याने इतर संघांना पाकिस्तान-दुबई असा प्रवास करावा लागत होता. फक्त भारतीय संघाला दोन देशांमध्ये प्रवास करावा लागला नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारताला अतिरिक्त फायदा मिळाल्याचा दावा फेटाळून लावला होता. तसंच मोहम्मद शमीनेही एकाच मैदानावर खेळणं अजिबात मदतशीर नव्हतं असं सांगितलं होतं.
"काहीतरी दिलं पाहिजे, भारताला सगळं काही देऊ शकत नाही. आयसीसीने भारताला नाहीदेखील म्हटलं पाहिजे. भारताला गतवर्षी टी-20 वर्ल्डकप खेळतानाही फायदा मिळाला होता. त्यांना सेमी-फायनल कुठे खेळवली जाणार हे आधीपासून माहिती होतं," असं रॉबर्ट्स यानी मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
पुढे ते म्हणाले, "चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताला अजिबात प्रवास करावा लागला नाही. स्पर्धेदरम्यान एखादा संघ कसा काय अजिबात प्रवास करु शकत नाही. हे योग्य नाही, हे क्रिकेट नाही. खेळाचे मैदान समान असले पाहिजे. मला माहित आहे की भारतातून खूप पैसा येतो, पण क्रिकेट हा एका देशाचा खेळ नसावा. आता तो एका देशाचा खेळ असल्यासारखे दिसते आहे आणि खेळाचे मैदान समान नाही".
आयसीसीने भारतानाला इतकी मोकळीक दिली आहे की, जर त्यांनी खेळाचे सामान्य नियम बदलण्यास सांगितलं तर तेदेखील बदलले जातील असा टोला त्यांनी लगावला आहे. "माझ्यासाठी आयसीसी म्हणजे इंडियन क्रिकेट बोर्ड आहे. भारत सर्व काही ठरवतो. उद्या जर भारताने नो बॉल, वाईड नको असं सांगितलं तर आयसीसी त्यांना खूश करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधेल," असं रॉबर्ट म्हणाले आहेत.
रोहितने याआधी सांगितलं होतं की, भारताला इतर कोणत्याही संघाप्रमाणे दुबईतील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ हवा आहे. "या खेळपट्ट्यांवर काय होणार आहे हे आम्हाला माहित नाही," असं रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या उपांत्य सामन्यापूर्वी सांगितलं. "उपांत्य सामन्यात कोणती खेळपट्टी वापरली जाईल हे आम्हाला माहित नाही, परंतु ती काहीही असो, आम्हाला जुळवून घ्यावे लागेल आणि ते कसे होते ते पहावे लागेल. आणि ते आमचे घरही नाही, हे दुबई आहे. आम्ही येथे इतके सामने खेळत नाही, ते आमच्यासाठीही नवीन आहे," असं तो म्हणाला होता.