Live शोमध्ये अपमान होताच शोएब अख्तरनं काय केलं...
शोएब अख्तरने लाइव्ह शोदरम्यान भडकला आणि तो शो मध्येच सोडून गेला.
मुंबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पाकिस्तानी चॅनल पीटीव्ही स्पोर्ट्सच्या लाइव्ह शोदरम्यान भडकला आणि तो शो मध्येच सोडून गेला. शोएब अख्तरसोबत या शोमध्ये वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर विवयन रिचर्ड्स आणि डेव्हिड गोवर देखील उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला. शोएब अख्तर या पीटीव्ही स्पोर्ट्स शोमध्ये पाकिस्तानी संघाच्या कामगिरीचा आढावा देत होता.
शोएब अख्तरचा अपमान करण्यात आला
पण या शोदरम्यान असं काही घडलं ज्यामुळे शोएब अख्तरने टीव्ही होस्ट डॉ. नौमान नियाज यांच्याकडून अपमानित झाल्यानंतर रागाच्या भरात शो सोडला. शो सोडल्यानंतर शोएब अख्तरने पीटीव्ही स्पोर्ट्स चॅनेलवरील क्रिकेट विश्लेषक पदाचा राजीनामा दिला.
शोएब अख्तरने सांगितलं की, मंगळवारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडवर 5 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर कार्यक्रमाच्या होस्टने आपल्याशी गैरवर्तन केलं आणि अपमान केला.
मंचावर मोठे दिग्गज होते उपस्थित
पाकिस्तानसाठी 46 कसोटी आणि 163 एकदिवसीय सामने खेळणारा शोएब अख्तर (46) शो सुरु असतानाच उठला. त्याने मायक्रोफोन काढला आणि निघून गेला. कार्यक्रमाचे यजमान नौमन नियाज यांनी त्याला परत बोलावण्याचा प्रयत्नही केला नाही आणि प्रतिसाद दिला नाही. त्याने तसाच कार्यक्रम चालू ठेवला. या कार्यक्रमात इतर पाहुणे सर व्हिव्हियन रिचर्ड्स, डेव्हिड गोवर, रशीद लतीफ, उमर गुल, आकिब जावेद इत्यादी उपस्थित होते.
सोशल मीडियावर सुरु झाली चर्चा
अख्तरने कार्यक्रम सोडल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ झाला. काही जणांनी नियाजला माफी मागण्यास सांगितलं. अख्तर आणि नियाज यांच्यातील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. अख्तर यांनी बुधवारी ट्विटरवर पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली.
अख्तरने ट्विट केले की, "सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येत आहेत, त्यामुळे मला वाटले की मी माझी भूमिका स्पष्ट करावी. नोमानने उद्धटपणा दाखवला आणि त्याने मला कार्यक्रम सोडण्यास सांगितलं."
अख्तर म्हणाला, "हे खूप लाजिरवाणं होतं, कारण तुमच्यासोबत सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि डेव्हिड गॉवरसारखे दिग्गज आणि माझे काही समकालीन आणि वरिष्ठही सेटवर बसले होते. या सर्व गोष्टीवर नौमानने माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता."