)
Shreyas Iyer Health Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात शनिवार 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे झालेल्या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाली होती. तब्येत बिघडल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं सध्या स्टार फलंदाजाची तब्येत ठीक असली तरी बीसीसीआयच्या मेडिकल स्टाफच्या सतर्कतेमुळे श्रेयसचा जीव वाचला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला कॅच पकडताना बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय मेडिकल टीमच्या ऑन-ग्राउंड डायग्नोसिस आणि तात्काळ कारवाईमुळे अय्यरचा जीव वाचला.
रविवारी दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार, 'आयसीसी मेडिकल कमिटी बीसीसीआय मेडिकल पॅनल आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिन प्रमुख डॉ. दिनशॉ पारदीवाला यांना सिडनीवरून श्रेयस अय्यरचे मेडिकल रिपोर्ट पाठवण्यात आले. त्याचा आढावा घेतल्यानंतर, बीसीसीआयला चार मुद्द्यांचा ईमेल पाठवण्यात आला, ज्यामध्ये शेवटच्या मुद्द्यात स्पष्टपणे म्हटले आहे की बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अय्यरचा जीव वाचवला. शेवटच्या पॉईंटमध्ये त्यांनी लिहिले की, 'उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाचे अभिनंदन. तुम्ही वेळेवर निदान आणि त्वरित कारवाईमुळे एक जीव वाचला'.
सोमवारी पीटीआयच्या एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला की श्रेयस अय्यर मैदानातून बाहेर आल्यावर बेशुद्ध होऊन खाली कोसळला. अय्यरच्या शरीराचे तापमान, नाडीचा वेग आणि रक्तदाबात चढ-उतार होत असल्याचं लक्षात आलं. तो बेशुद्ध पडल्याने त्याला झालेली दुखापत ही खूप गंभीर आले हे समोर आलं त्यामुळे अजिबात वेळ न घालवता त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. सूत्राने सांगितले की, "टीमचे डॉक्टर आणि फिजिओने कोणताही धोका न पत्करण्याची भूमिका स्वीकारली. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु ही दुखापत श्रेयससाठी प्राणघातक ठरु शकली असती. तो खूप सक्षम, कणखर आहे आणि तो लवकरच बरा होईल."
31 वर्षीय श्रेयस अय्यरची तब्येत आता ठीक असून त्याला आयसीयूमधून बाहेर काढल्याची माहिती आहे. भारतात परतण्यासाठी तंदुरुस्त घोषित होण्यापूर्वी किमान एक आठवडा सिडनी रुग्णालयात राहणं अपेक्षित आहे. त्याला पुढील दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. अंतर्गत रक्तस्त्रावापासून होणारा संसर्ग पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
श्रेयस अय्यरला दुखापत कधी आणि कशी झाली?
शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडनी येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान श्रेयस अय्यर कॅच पकडताना दुखापत झाली. कॅचसाठी उडी मारताना बरगडीला (रिब्स) धक्का बसला, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला.
श्रेयस अय्यरला आयसीयूत का दाखल केले?
तब्येत बिघडल्याने सोमवारी (२७ ऑक्टोबर) त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. मैदानाबाहेर आल्यानंतर तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला, ज्यामुळे तात्काळ रुग्णालयात नेले गेले. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने कोणताही धोका न घेता ही कारवाई केली.
बीसीसीआय मेडिकल स्टाफने श्रेयसचा जीव कसा वाचवला?
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, आयसीसी मेडिकल कमिटी, बीसीसीआय मेडिकल पॅनल आणि डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी सिडनीवरून मिळालेल्या मेडिकल रिपोर्टचा आढावा घेतला. त्यांनी ईमेलमध्ये चार मुद्द्यांमध्ये सांगितले की, बीसीसीआय वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ऑन-ग्राउंड डायग्नोसिस आणि तात्काळ कारवाईमुळे अय्यरचा जीव वाचला. शेवटच्या मुद्द्यात लिहिले, "उपस्थित वैद्यकीय पथकाचे अभिनंदन. तुम्ही वेळेवर निदान आणि त्वरित कारवाईमुळे एक जीव वाचवला."