पटौदी ट्रॉफीचं नाव बदलण्यावर काय म्हणाली सारा अली खान? आजी शर्मिला टागोरांनी सुद्धा व्यक्त केली होती नाराजी

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजचं नाव 2007 पासून पटौदी ट्रॉफी असं होतं. परंतु ते बदलून एंडरसन-तेंदुलकर ट्रॉफी असं ठेवण्यात आलं आहे. तेव्हा यावर दिग्गज क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदी यांची नात अभिनेत्री सारा अली खान हिने प्रतिक्रिया दिली आहे.   

पुजा पवार | Updated: Jul 5, 2025, 01:35 PM IST
पटौदी ट्रॉफीचं नाव बदलण्यावर काय म्हणाली सारा अली खान? आजी शर्मिला टागोरांनी सुद्धा व्यक्त केली होती नाराजी
(Photo Credit : Social Media)

Sara Ali Khan : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यासाठी सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली असून यातील पहिला सामना इंग्लंडने जिंकून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजचे नाव पूर्वी पटौदी ट्रॉफी असं होतं, परंतु आता त्याचं नाव बदलण्यात आलंय. पटौदी ट्रॉफी हे नाव बदलून त्याला एंडरसन-तेंदुलकर ट्रॉफी हे नाव दिलं गेलंय. तसेच ही सीरिज जो संघ जिंकेल त्या पटौदी मेडल ऑफ एक्सीलेंस दिलं जाईल. 

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये मुलाखती दरम्यान एका सेगमेंटमध्ये सारा अली खान म्हणाली की, पटौदीचा वारसा पाहून तिला अभिमान वाटतो. सारा म्हणाली, 'मला वाटते की हे नेहमीच चांगले असते. ते एवढे मोठे व्यक्ती होते. फक्त त्यांचे कौतुक करा, त्यांचा आदर करा, त्यांना लक्षात ठेवा. आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान वाटतो'.  

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदी यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या नावावर भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजला ' पटौदी ट्रॉफी' नाव देण्यात आलं होतं. मन्सूर अली खान पटौदी यांनी 1961 ते 1975 दरम्यान त्यांनी भारतासाठी 46 टेस्ट सामने खेळले, यात त्यांनी 2,793 धावा केल्या, ज्यामध्ये 6 टेस्ट शतकांचा समावेश होता. मन्सूर त्यांच्या 46 पैकी 40 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते, त्यापैकी फक्त 9 सामन्यांमध्ये त्यांच्या संघाला विजय मिळाला, 19 सामन्यांमध्ये पराभव झाला तर 19 सामने अनिर्णित राहिले. मन्सूर अली खान पटौदी हे अभिनेत्री सारा अली खानचे आजोबा होते. ईसीबीने 2007 पासून भारत इंग्लंड सीरिजला पटौदी ट्रॉफी असं नाव दिलं होतं. 

हेही वाचा : शुभमन गिलचं कौतुक करत होता सचिन, चाहत्याने सारा तेंडुलकरच्या लग्नाविषयी विचारला प्रश्न

 

शर्मिला टागोर काय म्हणाल्या होत्या ?

पटौदी ट्रॉफीचं नाव बदलण्यात आलं तेव्हा मन्सूर अली खान पटौदी यांच्या पत्नी अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सुद्धा मीडियाला प्रतिक्रिया दिली. या निर्णयाविषयी त्या थोड्या नाराज दिसल्या. बीसीसीआयच्या पटौदी ट्रॉफी निवृत्त करण्याच्या निर्णयावर शर्मिला टागोर म्हणाल्या, 'मला त्यांच्याकडून काहीच समजले नाही. परंतु ईसीबीने सैफला पत्र पाठवले आहे की ते ट्रॉफी निवृत्त करत आहेत. बीसीसीआयला टायगरचा वारसा लक्षात ठेवायचा असेल किंवा नसेल ते त्यांनीच ठरवायचा आहे', अशा भावाना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या.