नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर भारतात या ठिकाणी होणार जगातलं सर्वात मोठं तिसरं स्टेडियम
कोरोना काळात 100 कोटींचं कर्ज घेऊन भलंमोठं स्टेडियम उभारणार
मुंबई: कोरोना काळात कर्ज घेऊन सर्वात मोठं स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींसाठी आणि भारतासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियमनंतर आता आणखी एक मोठं स्टेडियम भारतातील एका शहरात उभारण्यात येणार आहे. हे स्टेडियम कुठे असणार त्याला खर्च किती येणार यासंदर्भात नुकतीच माहिती देण्यात आली आहे.
24 फेब्रुवारी 2021 रोजी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे अहमदाबाद येथे उद्घाटन करण्यात आले. आता या खेळाच्या चाहत्यांना आणखी एक अशाच मोठ्या स्टेडियमचा अनुभव लवकरच घेता येणार आहे. जगातील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम भारतात बांधण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच घोषणा करण्यात आली.
जयपूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने राजस्थान क्रिकेट असोसिएशनला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर शहरात आराखडा तयार करण्यासाठी जमीन दिली आहे. लवकरच इथे जगातील तिसरं सर्वात मोठं स्टेडियम उभारलं जाणार आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे आयुक्त गौरव गोयल यांनी चोंप गावात दिल्ली रोडवर स्टेडियम तयार करण्यासाठी आरसीएचे अध्यक्ष वैभव गहलोत यांच्याकडे कागदपत्र जमा केली.
जयपूरच्या या नवीन स्टेडियममध्ये 75 हजार लोक बसून सामना पाहण्यास सक्षम असणार आहे. मात्र हे स्टेडियम दोन टप्प्यांमध्ये बांधलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. गौरव गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 45000 लोकं बसू शकतील एवढी क्षमता असणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम हे 30,000 लोकांच्या क्षमतेने वाढवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 400 कोटींची गुंतवणूक करण्यात येईल. आरसीए 100 कोटी रुपयांचे कर्ज घेईल, कॉर्पोरेट बॉक्समधून 90 कोटी रुपये जमा होतील. अशी माहिती देखील गोयल यांनी दिली आहे. 100 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. साधारण हे स्टेडियम उभारण्यासाठी 3 वर्षांचा अवधी लागेल असा अंदाज आहे. कर्जादरम्यान बीसीसीआयने100 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. 100 कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. आरसीए आणि इतरांकडून 90 कोटी रुपये जमा केले जातील असंही यावेळी गोयल म्हणाले.
जगातील सर्वात मोठे 5 स्टेडियम कोणते आहेत?
1.नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत- 1, 10, 000 क्षमता
2.मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, ऑस्ट्रेलिया- 1, 00, 024 क्षमता
3.ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत- 80, 000 क्षमता
4. वीर नारायण सिंह स्टेडियम, रायपूर, भारत- 65, 400 क्षमता
5.ऑप्टस स्टेडियम, पर्थ, ऑस्ट्रेलिया- 60, 000 क्षमता
या स्टेडियममध्ये इंग्लंडच्या साऊथॅम्प्टनसारखा खास सोयीसुविधा खेळाडूंसाठी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. नवीन स्टेडियममध्ये दोन सराव मैदानाव्यतिरिक्त, अकादमी, क्लब हाऊस हॉटेल आणि इतर सर्व आधुनिक सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. जे सर्व आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उपलब्ध आहे. हे स्टेडियम बायो बबलसाठी म्हणून देखील भविष्यात वापरलं जाऊ शकतं अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.