World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये मलाला युसुफझईचा भारतावर निशाणा
क्रिकेट वर्ल्डकपची ओपनिंग सेरेमनी बुधवारी इंग्लंडमध्ये पार पडली.
लंडन : क्रिकेट वर्ल्डकपची ओपनिंग सेरेमनी बुधवारी इंग्लंडमध्ये पार पडली. या सोहळ्याला सर्व देशाच्या क्रिकेट टीमचे कर्णधार, माजी क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. नोबेल पुरस्कार जिंकणारी पाकिस्तानची मलाला युसुफझईने या कार्यक्रमात भारतावर निशाणा साधला. यामुळे सोशल मीडियावर मलालाला ट्रोल करण्यात येत आहे.
वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये ६० सेकंड चॅलेन्ज नावाचा खेळ खेळण्यात आला. यामध्ये प्रत्येक देशाचा एक खेळाडू आणि एक सेलिब्रिटी यांनी प्रतिनिधीत्व केलं. ६० सेकंदांमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचं आव्हान या ६० सेकंड चॅलेन्जमध्ये देण्यात आलं होतं. व्हिव्ह रिचर्ड्स, जॅक कॅलिस, ब्रेट ली, केव्हिन पीटरसन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या चॅलेन्जमध्ये सहभागी झाले होते.
इंग्लंडचे केव्हिन पीटरसन आणि क्रिस ह्युजस यांनी सर्वाधिक ७४ रन करून हे चॅलेंज जिंकलं. तर ऑस्ट्रेलियाचे ब्रेट ली आणि पॅट कॅश ६९ रनसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
भारताकडून अनिल कुंबळे आणि बॉलीवूड अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक फरहान अख्तर या चॅलेंजमध्ये सहभागी झाले. या दोघांना ६० सेकंदांमध्ये फक्त १९ रनच करता आले. यामुळे कुंबळे आणि फरहान अख्तरची जोडी शेवटच्या क्रमांकावर राहिली.
या चॅलेंजमध्ये पाकिस्तान भारताच्या एक क्रमांक वर सातव्या क्रमांकावर राहिला. यानंतर मलालाने भारतावर निशाणा साधला. 'पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आलं, फार वाईट कामगिरी केली नाही. ठीकठाक प्रदर्शन राहिलं, पण भारत शेवटचा आला', असं मलाला म्हणाली.
वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये मलालाने मुलींनी खेळाकडे वळण्याबाबतचं महत्त्व सांगितलं. तसंच मी लहानपणापासून क्रिकेटची चाहती आहे. मी रस्त्यावर आणि गच्चीवर क्रिकेट खेळायचे. आऊट झाल्यानंतरही मी खेळण्यासाठी माझ्या भावांशी भांडायचे. हा खेळ वेगवेगळी संस्कृती आणि पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना जोडतो. या खेळामुळे देश जोडले जात आहेत, असं वक्तव्य मलालाने केलं.
या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जूनला मॅन्चेस्टरमध्ये मॅच खेळवण्यात येणार आहे. आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपच्या ६ मॅच झाल्या. या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे.