World Cup 2019 : जांभाईच्या वादावर सरफराज अहमदने मौन सोडलं
वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला.
लंडन : वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी ट्रोल केलं. या मॅचमध्ये विकेट कीपिंग करताना सरफराज अहमदने जांभाई दिली. या जांभाईमुळेही सरफराज अहमदवर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर सरफराज अहमद काही दिवस गप्प होता, पण आता त्याने या वादावरुन मौन सोडलं आहे.
'जांभाई देण सामान्य गोष्ट आहे. जांभाई देऊन मी काही पाप केलं नाही. जांभाई आली तर आली. तसंही मॅच थांबलेली असतानाच मी जांभाई घेतली. सगळ्यांनी व्हिडिओ बनवून व्हि्यूज घेतले. भरपूर पैसे कमवले असतील. माझ्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल तर चांगली गोष्ट आहे,' असं सरफराज म्हणाला.
भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ४९ रननी विजय झाला. हारिस सोहिलने या मॅचमध्ये ८९ रनची दमदार खेळी केली.
'या मॅचसाठी आम्ही टीममध्ये बदल केले. काही मॅच आम्ही दुसऱ्या खेळाडूंना घेऊन खेळलो. पण कधी-कधी टीमसाठी बदल गरजेचा असतो. हारिसमध्ये मॅच खेळण्याची भूक दिसत होती,' अशी प्रतिक्रिया सरफराजने दिली.
या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे ६ मॅचमध्ये ५ पॉईंट्स आहेत. आता पाकिस्तानच्या मॅच न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. या तिन्ही मॅच जिंकल्यास पाकिस्तानच्या खात्यात ११ पॉईंट्स होतील. तरी पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागू शकतं.