`कर्णधारपदाचा माझ्या बॅटिंगवर...`; कॅप्टन म्हणून आफ्रिदी, रिझवानची चर्चा असताना बाबर स्पष्टच बोलला
World Cup 2023 Babar Azam On Captaincy: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत पहिल्या 5 सामन्यांपैकी 3 सामने गमावले ज्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे.
World Cup 2023 Babar Azam On Captaincy: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या टीकेचा धनी ठरत आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी संघाचा अफगाणिस्तानने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटूंबरोबर अनेक क्रिकेटतज्ज्ञ बाबरच्या कर्णधारपदावरुन भाष्य करताना दिसत आहे. आपल्या 5 पैकी 3 सामने गमावणाऱ्या पाकिस्तानी टीमचं नेतृत्व बाबर आझमकडून काढून घेण्यात यावं अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरु आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव बाबरच्याही जिव्हारी लागला आहे. या पराभवामुळे सेमी फायनल्सच्या पाकिस्तानच्या आशा अधिक धूसर झाल्या आहेत. सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे की बाबरच्या नेतृत्वावर अगदी चाहत्यांनीही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
बाबर आझमची सुमार कामगिरी
बाबरने अफगाणिस्तानविरुद्ध 72 धावांची खेळी केली. मात्र बाबरची ही फारच संथ होती कारण यासाठी त्याने 92 बॉल खर्च केले. बाबर आझम वर्ल्ड कप पूर्वीच्या मालिकांमध्ये दमदार कामगिरी करताना दिसला. मात्र वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमला भारत वगळता कोणत्याही संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात बाबर 18 बॉलमध्ये 5 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या सामन्यात बाबर 15 बॉलमध्ये 10 धावा करुन तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 14 बॉलमध्ये 18 धावा करुन बाद झाला. भारताविरुद्ध बाबरने अर्धशतक झळकावत 58 बॉलमध्ये 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 350 हून अधिक धावांचा पाठलाग करताना 2 विकेट्स गेलेल्या असताना बाबर एक बेजबाबदार फटका खेळून झेलबाद झाला. असाच काहीसा प्रकार बाबरने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सेट झाल्यानंतर 41 व्या ओव्हरला आपली विकेट फेकत केला आणि पाकिस्तानी संघ अडचणीत आला.
नक्की वाचा >> 'बाबर स्वत:च्या रेकॉर्डसाठी खेळत होता! संघासाठी नाही, कारण...'; कॉमेंट्री बॉक्समधून हल्लाबोल
बाबरने स्पष्ट केली भूमिका
बाबर आझमला वर्ल्ड कपमध्ये फलंदाज म्हणून त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता येत नसून यासाठी त्याच्याकडे असलेले कर्णधारपद कारणीभूत असल्याचं अनेकांचं मत आहे. अनेकांच्या मनातली खदखद एका पत्रकाराने थेट बाबर आझमला बोलून दाखवल्यानंतर त्यानेही आपल्या कर्णधारपदासंदर्भात सूचक वक्तव्य केलं. एकीकडे शाहीन शाह आफ्रिदी किंवा मोहम्मद रिझवानकडे पाकिस्तानी संघाचं नेतृत्व सोपवण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असतानाच बाबरने कर्णधारपदासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नक्की वाचा >> 'रोज 8-8 किलो मटण खाता तरी...'; संतापलेल्या वसीम अक्रमने पाकिस्तानी संघाचं खाणंच काढलं
कर्णधारपदाचा अतिरिक्त दबाव?
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बाबरने साधलेल्या संवादादरम्यान त्याला, "तुझ्यावर कर्णधारपदाचा अतिरिक्त दबाव असून त्यामुळे तुझ्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाला आहे का? संघाची सुमार कामगिरी आणि कर्णधारपदाची जबाबदारी याबद्दल तू काय सांगशील?" असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला.
नक्की वाचा >> 'बाबर आझमला Six मारण्याची सवय असती तर...'; PCB च्या माजी अध्यक्षांचा 'पुणेरी टोमणा'
बाबर कर्णधारपदासंदर्भात काय म्हणाला?
या प्रश्नाला उत्तर देताना बाबर आझमने, "क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मैदानात कधी काहीही होऊ शकते. आम्ही अगदी शेवटपर्यंत आमचा उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न मैदानात करतो. अनेक सामने शिल्लक आहे. आम्ही उरलेले सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या चूका सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर म्हटलं.
पुढे बोलताना बाबरने कर्णधारपदासंदर्भात भाष्य केलं. "कर्णधारपदाबद्दल बोलायचं झालं तर, माझ्यावर या गोष्टीचा फार दबाव आहे असं काहीही नाही. किंवा याचा माझ्या फलंदाजीवर परिणाम होतोय असंही नाही. मी फलंदाजीमध्ये माझं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मी 100 टक्के प्रयत्न करतोय. फिल्डींग करताना मी कर्णधार म्हणून विचार करतो आणि फलंदाजी करताना केवळ फलंदाज म्हणून विचार करतो. मी धावा कशा काढाव्यात आणि संघाला जास्तीत जास्त धावा करुन देण्यासाठी काय करावं याचा मी फलंदाजी करताना विचार करत असतो," असं बाबर म्हणाला.