)
World Cup 2025 IND VS AUS: भारतीय संघातील स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने सेमी फायनलमध्ये धडाकेबाज कामगिरी करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतीय महिला क्रिकेट संघाने यावेळी एकाच सामन्यात अनेक रिकोर्ड मोडले.
जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद 127 धावांच्या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सनी हरवून आयसीसी महिला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याशिवाय हरमनप्रीत आणि जेमामाच्या सर्वोच्च भागिदारीनेही कमाल केली. शेवटी चौकार मारणाऱ्या अमनज्योत कौरचा देखील या एतिहासिक विजयात मोठा वाटा आहे. घवघवीत विजय मिळवल्यावर आनंदाचे अश्रू पुसताना, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाली कर्णधार हरमनप्रीत?
हरमनप्रीत सामन्यानंतर म्हणाली. "आमच्या संघात असे खेळाडू आहेत जे कोणत्याही परिस्थितीत सामने जिंकू शकतात." त्यानंतर सामनावीर जेमिमा रॉड्रिग्जचे कौतुक करताना म्हटले, "ती अशी व्यक्ती आहे जी नेहमीच संघासाठी चांगले काम करू इच्छिते. तिला नेहमीच जबाबदारी घ्यायची असते. आमची मैदानावर चांगली भागीदारी होती आणि संघासाठी संयम राखण्यासाठी आणि फलंदाजी करण्यासाठी तिला बरेच श्रेय जाते."
हरमनप्रीतने अंतिम सामन्याबद्दल सांगितले की, "आज आम्ही चांगलं खेळलो आणि निकालाने मी खूप आनंदी आहे. आम्ही पुढच्या सामन्याबद्दल आधीच तयारी सुरु केली आहे. घरच्या मातीत (मैदानावर) विश्वचषक खेळणे अगदी खास आहे. अजून एक सामना बाकी आहे आणि आम्ही आमचे सर्वस्व देऊ."
जेमिमा काय म्हणाली?
सामनावीर रॉड्रिग्ज म्हणाली, "माझ्या येशूशिवाय शक्य झाले नसते. मी माझ्या पालकांची देखील आभारी आहे. मला फक्त पाच मिनिटांपूर्वी कळले की मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. गेल्या वेळी मी विश्वचषकात पोहोचू शकले नाही, पण यावेळी मला संधी मिळाली."
शतक ठोकल्यानंतरही रॉड्रिग्जने आनंद साजरा केला नाही आणि ती म्हणाली, "ते माझ्यापूरते होते पण मला भारतासाठी हा सामना जिंकायचा होता. आम्ही यापूर्वी अनेक महत्त्वाचे सामने गमावले होते, म्हणून मला भारताला हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत करायची होती. हा सामना माझ्या अर्धशतकाबद्दल किंवा शतकाबद्दल नव्हता, तर भारताला जिंकण्यास मदत करण्याबद्दल होता."
दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली म्हणाली, "हा एक चांगला सामना होता. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, चांगली गोलंदाजीही केली नाही. आम्ही मैदानावर अनेक संधी गमावल्या. शेवटी, आम्ही पराभूत झालो."