IPL 2025: 'अर्जुन तेंडुलकरला तुम्ही वाया घालवत आहात'; योगराज सिंग स्पष्टच बोलले, 'कुठे त्याला बॉलिंग...'

IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू योगराज सिंग (Yograj Singh) यांनी अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) काही काळासाठी प्रशिक्षण दिलं होतं. यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावलं होतं.  

शिवराज यादव | Updated: Mar 25, 2025, 08:50 PM IST
IPL 2025: 'अर्जुन तेंडुलकरला तुम्ही वाया घालवत आहात'; योगराज सिंग स्पष्टच बोलले, 'कुठे त्याला बॉलिंग...'

IPL 2025: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला अद्यापही अपेक्षित संधी आणि यश मिळालेले नाही. डावखुरा गोलंदाज असणारा अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू असून त्याच्याकडून नेहमीच अपेक्षांचं ओझं राहिलं आहे. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2023 मध्ये मुंबईकडून खेळताना संधी मिळाली होती. यावेळी त्याने चार सामन्यात तीन विकेट्स घेतले होते. आयपीएल 2024 मध्ये खेळलेल्या एका सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.  युवराज सिंगचे वडील आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू योगराज सिंग (Yograj Singh) यांनी अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) काही काळासाठी प्रशिक्षण दिलं होतं. यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावलं होतं.

राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज पंजाबचा माजी खेळाडू तरुवर कोहलीला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकरने त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करावं असा सल्ला दिला आहे. 

"जर अर्जुन तेंडुलकर आज माझ्याकडे आला, तर मी त्याला पुढील सहा महिन्यात जगातील सर्वोत्तम फलंदाज बनवेन. कोणालाही त्याच्यात फलंदाज म्हणून असलेल्या क्षमता माहित नाहीत. तो माझ्यासोबत 12 दिवस होता. त्याने रणजीमधील पहिल्या सामन्यात शतक ठोकलं. कोणाच्या ते लक्षात आलं का?," असं योगराज म्हणाले,

"गोव्याचा संघ येथे होता. सचिन आणि युवराज यांनी मला अर्जुन तेंडुलकरला प्रशिक्षण देण्यास सांगितलं. तो माझ्यासोबत 10 ते 12 दिवस होता. मला तो उत्तम फलंदाज वाटला. उगाच त्याला गोलंदाजीच्या मागे लावलं आहे. तुम्ही त्याला गोलंदाजीत वाया का घालवत आहात?" एक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून तो चांगला आहे," असं योगराज सिंग म्हणाले आहेत.

यापूर्वी, एका वेगळ्या मुलाखतीत योगराज यांनी दावा केला होता की प्रशिक्षण दिल्यानंतर 12 दिवसांत अर्जुनने गोव्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरुद्ध शतक ठोकलं. त्यानंतर अर्जुनने मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल करारही केला. युवराज सिंगच्या वडिलांनी पुढे सांगितले की अर्जुनने त्याच्या हाताखाली प्रशिक्षण थांबवण्याचे कारण म्हणजे त्याचे नाव माझ्यासोबत जोडलं जावं असं कोणालाही वाटत नव्हतं.

"जेव्हा त्याने शतक ठोकलं आणि आयपीएलमध्ये परतला तेव्हा लोकांना त्याचं नाव माझ्याशी जोडलं गेलं तर काय? अशी भिती वाटत होती. मी काय म्हणतोय तुम्हाला समजतयं ना? त्याच्या नावापुढे माझा टॅग लागेल याची त्यांना भिती होती," असं योगराज यांनी 'Unfiltered by Samdish' कार्यक्रमात म्हटलं होतं. मी युवराजला सांगितलं होतं की, सचिनला सांग त्याला माझ्याकडे वर्षभरासाठी सोड आणि बघ काय होतं असा खुलासाही त्यांनी केला. 

2023 मध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून पाच आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पाच वेळा विजेत्या संघाने अर्जुनला त्याच्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर परत आणले. योगराज यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास 66 वर्षीय योगराज यांनी भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले. भारतीय संघासाठी त्याने शेवटचा सामना 1981  मध्ये खेळला होता.