'तर अर्जुन तेंडुलकरचा ख्रिस गेल होईल', युवराजच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं, 'फक्त तीन महिन्यात...'

अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर जास्त लक्ष्य केंद्रीत करावं असा सल्ला युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 24, 2025, 08:11 PM IST
'तर अर्जुन तेंडुलकरचा ख्रिस गेल होईल', युवराजच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं, 'फक्त तीन महिन्यात...'

अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर जास्त लक्ष्य केंद्रीत करावं असा सल्ला युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी दिला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात आहे. मात्र त्याला या हंगामात अद्यापपर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकरला गोवा रणजी संघात स्थान मिळण्यासाठी मदत केली होती. अर्जुन तेंडुलकरने त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतंल. दरम्यान नुकतंच त्यांनी अर्जुन तेंडुलकरबाबत एक भविष्यवाणी केली आहे. जर युवराज सिंगने अर्जुनला आपल्या पंखाखाली घेतलं आणि त्याच्या फलंदाजी कौशल्यावर काम केलं तर तो पुढचा ख्रिस गेल ठरु शकतो असा दावाच योगराज सिंग यांनी केला आहे. 

"मी अर्जुनला आपल्या गोलंदाजीवर कमी आणि फलंदाजीवर जास्त लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितलं. जर युवराजने अर्जुनला तीन महिन्यांसाठी आपल्या पंखांखाली घेतलं तर तो पुढचा ख्रिस गेल होऊ शकतो. बऱ्याचदा असं घडतं की जर एखादा वेगवान गोलंदाज स्ट्रेस फ्रॅक्चरला सामोरं गेला तर तो तितका प्रभावीपणे गोलंदाजी करू शकत नाही. मला वाटतं की अर्जुनला काही काळासाठी युवराजकडे सोपवलं पाहिजे," असं मत योगराज सिंग यांनी मांडलं आहे.

योगराज सिंग यांनी याआधी अभिषेक शर्माचं कौशल्य हेरण्यात युवराज सिंगने मोलाची भूमिका निभावल्याचं सांगितलं होतं. योगराज म्हणाले की, युवराजने पहिल्यांदाच पंजाबमधील विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये अभिषेकच्या प्रभावी कामगिरीची नोंद घेतली आणि लगेचच पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून त्याची आकडेवारी मागितली. पीसीएने त्याचा उल्लेख गोलंदाज म्हणून केला होता हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं.

“जेव्हा आम्ही पीसीए आणि प्रशिक्षकांकडून अभिषेक शर्माच्या कामगिरीची माहिती मागितली तेव्हा ते काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे का? सर  तो एक गोलंदाज आहे. तो गोलंदाजी करतो. युवराज म्हणाला, ‘तुम्ही फक्त त्याच्या कामगिरीचे रेकॉर्ड पहा’. जेव्हा आम्ही रेकॉर्ड पाहिला तेव्हा अभिषेकच्या नावे आधीच 24 शतकं होती. युवी म्हणाला, ‘तुम्ही चुकीची माहिती का देत आहात? का? या खेळाचूने 24 शतकं ठोकली आहेत’. याला सहा-सात वर्षं झाली,” असं योगराज सिंग यांनी क्रिकेट नेक्स्टला सांगितलं.

योगराज यांनी पुढे सांगितलं की, "युवराजने मला तो रेकॉर्ड पाठवला, आणि मला म्हणाला या खेळाडूला पाहा". मी त्याला सांगितलं, हे बघ हे सगळं माहिती शेअर करण्यासंदर्भात आहे. नेमकी हीच समस्या आहे. काही लोक एखाद्याचं करिअर करण्याऐवजी फक्त मत्सरापोटी त्या खेळाडूला संपवतात".

"युवराजने अभिषेक आणि गिल यांना रात्रीच्या पार्ट्यांना जाण्यापासून रोखलं"

योगराज सिंग यांनी यावेळी युवराज सिंगने कशाप्रकारे अभिषेक शर्माला शिस्त लावली याबद्दलही सांगितलं. युवराज सिंगने अभिषेकला रात्री उशिरा पार्ट्यांमध्ये जाण्यापासून आणि गर्लफ्रेंड्सला भेटण्यापासून रोखल्याचं योगराज सिंग म्हणाले. 

"रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या, प्रेयसी...मग का झालं? युवराज म्हणाला 'त्याला लॉक करा.' त्याचे वडील हाताळू शकत नसल्याने तो युवराज सिंगच्या पंखांखाली आला होता. युवराज एकदा जोरात ओरडला होता. कुठे आहेस? मी त्याला ओरडताना ऐकलं होतं. 'रात्रीचे 9 वाजले आहेत, झोप जा. तुला समजलं का? मी येत आहे'. यानंतर त्याने फोन दिला आणि झोपायला गेला. युवराजने नंतर पहाटे 5 वाजता उठवण्यास सांगितलं," असा खुलासा योगराज यांनी केला.