मोबाईलवर एखाद्या ऑफरची लिंक आली असेल तर सावधान !

व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) जवळ येत आहे. 14 फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर ऑफर्सचा धुमधडाका सुरू झाला आहे.  

Updated: Feb 4, 2021, 03:54 PM IST
मोबाईलवर एखाद्या ऑफरची लिंक आली असेल तर सावधान !  title=

प्रशांत अंकुशराव / मुंबई : व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) जवळ येत आहे. 14 फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर ऑफर्सचा धुमधडाका सुरू झाला आहे. तुमच्या मोबाईलवरही अशीच एखाद्या ऑफरची लिंक आली असेल तर सावधान. (Beware of fake offers posted before Valentine's Day) आम्ही असं का सांगतोय, पाहूयात हा रिपोर्ट.

मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये कुटुंबासह सात दिवस मोफत राहण्याची सोय. अशा प्रकारच्या गिफ्ट कार्डचा मेसेज जर तुम्हालाही आला असेल तर सावधान. त्या खाली असलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करु नका. (Valentine's Day : Beware of fake Offer on mobile) कारण तुम्ही ही लिंक ओपन केली की तुम्ही उद्ध्वस्त झालाच म्हणून समजा. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो. तुमचं बँक अकाऊंटही रिकामं होऊ शकतं.  अशाप्रकारच्या ऑफरच्या लिंकशी आमचा काहीही संबंध नसल्याचं ताज हॉटेलनंही स्पष्ट केले आहे.

व्हॅलेंटाईन डेचं निमित्त असो की कोरोना लसीकरण. सायबर गुन्हेगार आपलं  सावज हेरण्यासाठी नवनवे फंडे वापरून फेक लिंक पसरवू लागलेत. त्यामुळे अशा खोट्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञही देतात. याबाबत मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai cyber police) काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बँकांच्या नावाने बोगस फोन कॉल करुन अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना ताज्या आहेत.. त्यात आता अशा फेक लिंकची भर पडली आहे. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांनो होऊ नका सावज. व्हा सावध.