)
What Is Call Merging Scam: सायबर गुन्हेगारीचे रोज नवीन प्रकार समोर येत असतानाच हल्ली शेअर मार्केट, डिजिटल अरेस्टचा धोका कायम आहे. त्यातच आता व्हॉट्सअॅप हॅकिंग, सिम स्वॅपपाठोपाठ कॉल मर्जिंग स्कॅमचा नवा धोका समोर आला आहे. कॉल मर्जिंग स्कॅम हा तुमच्यासोबतही घडू शकतो. नेमकं यामध्ये होतं काय हे समजून घेऊयात.
कॉल मर्जिंग स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार मोबाइलवरील 'कॉल मर्ज फीचर'चा गैरवापर करून ओटीपी मिळवतात आणि पैसे चोरतात. त्यामुळे यापासून राहण्याचा इशारा महाराष्ट्र सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिला.
तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल येतो. कॉल करणारी व्यक्ती तुमचा विश्वास संपादन करते आणि दुसरा कॉल मर्ज करण्यास सांगितलं जातं दुसरा कॉल हा ओटीपी कॉल असतो. स्कॅमर शांतपणे ओटीपी ऐकतो. व्यवहार पूर्ण होतो आणि पैसे चोरीला जातात. विशेष म्हणजे हा असा घोटाळा करणाऱ्या स्कॅमरकडे आधीच तुमची बँक माहिती असते. ओटीपी मिळवण्यासाठीच कॉल मर्जची युक्ती वापरली जाते.
अनोळखी कॉलसोबत दुसरा कॉल मर्ज करू नका. कॉल कट करून अधिकृत नंबरवरून समोरची व्यक्ती कोण आहे व्हेरिफाय करुन घ्या. फक्त अधिकृत अॅप्स वापरा. अॅप्स इन्स्टॉल करताना अनावश्यक परवानग्या नाकाराव्यात. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी, पिन, सिव्हिव्ही क्रमांक कोणालाही शेअर करू नका.बँक कधीही फोनवर ओटीपी किंवा पिन विचारत नाही हे लक्षात घ्या. कॉल मर्ज करण्याची विनंती म्हणजे स्कॅमचा इशारा आहे हे कायम लक्षात ठेवा
डेटा लिक, फिशिंग वेबसाइट्स, मालिशियस अॅप्स, प्रतिरूप कॉल्स ही माहिती वापरून ते कॉल मर्ज करायला लावतात आणि ओटीपी चोरुन फसवणूक करतात.
अचानक नेटवर्क बंद होणे, ओटीपी/एसएमएस न येणे. यूपीआय अॅप्समध्ये पुन्हा लॉगिन करण्याचं नोटिफिकेशन येणं किंवा नवीन सिम अॅक्टिव्हेशनचं नोटिपिखेशन ही सर्व फसवणुकीची लक्षणे आहेत.
सायबर गुन्हेगार व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते गुगल व्हेरिफिकेशन कोड किंवा ओटीपी मागतात. तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सहभागी होणे किंवा ओळख पटवणे अशा कारणं दिली जातात. कोड मिळाल्यावर ते पीडिताचा नंबर वापरून व्हॉट्सअप स्वतःच्या मोबाइलवर इन्स्टॉल करतात आणि चॅट्स व संपर्क यादीवर ताबा मिळवतात. अकाउंट ताब्यात घेतल्यावर हे गुन्हेगार पीडिताच्या मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना मेसेज पाठवतात. अनेक वेळा व्यवसायातील कर्मचारी मालक किंवा वरिष्ठ अधिकारी असल्याचा भासवणारा मेसेज मिळवतात आणि तातडीने पैसे किंवा गोपनीय माहिती घेत फसवणूक करतात.
सिम स्वॅप फसवणुकीत फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे वापरून नवीन सिम मिळवतात. मूळ सिम बंद झाल्यावर ओटीपी आणि संदेश फसवणूक करणाऱ्याला मिळतात. बँक, यूपीआय, ई-मेल, सोशल मीडिया खाती त्यांना हाताळता येतात. फिशिंग कॉल्स, बनावट केवायसी/नोकरी अर्ज, डार्क वेबवरील लिक डेटाबेस, सोशल मीडिया प्रोफाइल आणि बनावट अॅप्सद्वारे सायबर गुन्हेगार पीडितांची माहिती गोळा करतात.
जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 3372 सायबर गुन्हे नोंदवण्यात आले असून 868 जणांना अटक करण्यात आली आहे. यंत्रणांना 1019 प्रकरणांचा छडा लावण्यात यश आलं आहे. सायबरसंदर्बातील काही तक्रारी असल्यास 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर तसेच cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते.