)
New Rule For Social Media: इंटरनेच्या जगात सारं काही हातातील पाच इंचाच्या स्क्रीनवर आलं आहे असं म्हणतात. त्यातही मोबाईलवरील सोशल मीडिया हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भागा झाला असून आज प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे. फोटो, पोस्ट, शॉर्ट व्हिडीओ, रिल्स यासारख्या अनेक गोष्टींमध्ये वेळ कसा जातो कळतही नाही. अनेकांना तर सोशल मीडियाचं व्यसन लागलं असून सोशल मीडिया नसेल तर बऱ्याच जणांना अस्वस्थ झाल्यासारखं होतं. यामुळेच सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरचा दबदबा वाढला आहे. अनेकजण या इन्फ्लुएन्सरच्या नादाला लागून वाटेल ते प्रयोग करण्यासाठी तयार असतात. पण या इन्फ्लुएन्सर्सचाही सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
इन्फ्लुएन्सरच्या नादी लागून फॉलोअर्स काहीतरी विचित्र गोष्टी करुन बसतात. रोज अशी एखादी ना एखादी बातमी समोर येत असते. यावरुनच सोशल मीडिया आणि सोशल इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव किती आहे हे अधोरेखित होतं. म्हणूनच या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून चुकीची माहिती जाऊ नये म्हणून चीन सरकारने कायदाच बदलला आहे. फुटकचा सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरला चीन सरकारने मोठा धक्का दिला आहे.
चीनमध्ये आता सोशल मीडियावरुन इन्फ्लुएन्सर म्हणून एखादा सल्ला देताना किंवा कंटेट पोस्ट करताना अधिक सतर्क रहावं लागणार आहे. अनेक इन्फ्लुएन्सर सतत फुकटचे सल्ले देत असतात. सतत कंटेट तयार करण्याचं बंधन असल्याने बऱ्याचदा माहितीशी तडजोड केली जाते. या अशा घातक माहितीचा फॉलोअर्सवर, समाजावर परिणाम होऊ शकतो हे अनेक उदाहरणांमधून समोर आलं आहे. खास करुन आरोग्य, अर्थ, कायदेशीर सल्लांबद्दलच्या माहितीचा खासगी जीवनावर आणि समाजावर मोठा परिणाम होतो. म्हणूनच या विषयांवर वाटेल ते बरळणाऱ्या इन्फ्लुएन्सरला चीनमधील कम्युनिस्ट सरकारने दणका दिला आहे.
सोशल मीडियावरुन लोकांना सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरकडे त्या विषयातील पदवी असणं बंधनकारक असणार आहे. ज्यांच्याकडे सदर विषयारी पदवी असेल त्यांनाच इन्फ्लुएन्सर म्हणून सोशल मीडियावरुन सल्ला देण्याचा अधिकार असेल असं सपराकने स्पष्ट केलं आहे. एखाद्या व्यक्तीकडे संबंधित क्षेत्रातील ठोस माहिती नसेल आणि त्या विषयाची पदवी नसेल तर त्याला असा कंटेटं तयार करता येणार नाही. म्हणजेच आता सोशल मीडियावरील फुकटचे सल्ले चीनमध्ये बंद झाले आहेत. हा नियम 25 ऑक्टोबर 2025 रोजीपासून लागू झाला आहे.
चीनमधील 'सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना'ने (Cyberspace Administration of China) नवी नियमावली तयार केली आहे. सोशल मीडियावरील भ्रामक माहिती, फसवणूक आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी हे पाऊल टाकल्याचे समोर आले आहे. आता जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्फ्लुएन्सरची सत्यता, त्यांचे त्या क्षेत्रातील ज्ञान आणि पदवीची तपासणी करावी लागणार आहे. त्यांची माहिती योग्य आहे की नाही हे सुद्धा तपासण्याचे काम करावे लागणार आहे.
क्रिएटर्सला आता ते तज्ज्ञ असलेल्या क्षेत्राबद्दल स्पष्टपणे माहिती द्यावी लागणार आहे. आपला अभ्यास कोणत्या क्षेत्रात आहे हे त्यांना अगोदरच जाहीर करावे लागणार आहे. तसेच एआयचा वापर करून कंटेंट तयार केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे. माहितीवर आधारित कंटेंटमधून एखाद्या कंपन्यांची जाहिरात करण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. क्रिएटर्सकडून हे सारं करुन घेण्याची जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही असणार आहे. नियम मोडल्यास दोघांनाही दंड ठोठावला जाईल असं सांगण्यात आलं आहे.
चीनमध्ये वीचॅट (WeChat) हे सर्वात लोकप्रिय सोशल मॅसेजिंग ॲप्लिकेशन आहे. यावर 1.3 अब्ज मासिक युझर्स आहेत. या ॲप्लिकेशनवर मॅसेजिंग, पेमेंट, मिनी-ॲप्स, सोशल नेटवर्किंग सर्वकाही आहे. याशिवाय चीनमध्ये टिकटॉकचे चिनी व्हर्जन ड्यइन (Douyin) हे लोकप्रिय ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनला शॉर्ट व्हिडिओमधील अग्रगन्य ॲप्लिकेशन मानलं जातं. या ॲपचे 700 दशलक्ष युझर्स आहेत. तर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मबरोबरच भारतातील ट्विटरसारखे विबो (Weibo) हे ॲप्लिकेशन पण लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मचे 600 दशलक्षहून अधिक युझर्स आहेत.
भारतातील इन्फ्लुएन्सरचा सुळसुळाट पाहता आपल्या देशातही असाच कायदा लागू केला पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करुन नक्की सांगा.