KDMC वरुन राज ठाकरेंना 'ब्लॅकमेल' करणारा मनसेतील 'तो' नेता कोण? म्हणतोय 'जर तुम्ही मला काही..'

MNS-Shinde Shivsena Alliance in KDCM creates new controversy: कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी गांभीर्याने दखल घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरे व्यथित असून, मला काही दिलं नाही तर सोडून जातो अशा मानसिक स्थितीत काहीजण असल्याचं संजय राऊतांना सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 21, 2026, 06:12 PM IST
KDMC वरुन राज ठाकरेंना 'ब्लॅकमेल' करणारा मनसेतील 'तो' नेता कोण? म्हणतोय 'जर तुम्ही मला काही..'

MNS-Shinde Shivsena Alliance in KDCM creates new controversy: कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी गांभीर्याने दखल घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरे व्यथित असून, मला काही दिलं नाही तर सोडून जातो अशा मानसिक स्थितीत काहीजण असल्याचं संजय राऊतांना सांगितलं आहे. प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही अशी हतबलताही त्यांनी संजय राऊतांकडे बोलून दाखवली आहे. संजय राऊत यांनी स्वत: मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

'उद्धव ठाकरेंनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला'

संजय राऊतांनी यावेळी राज ठाकरेंना पक्षातील काहीजण काही मिळालं नाही तर सोडून जातो असं सांगत असल्याचा खुलासा केला. त्यामुळे राज ठाकरेंना पक्षातून कोण ब्लॅकमेल करत आहे किंवा धमकावत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

"उद्धव ठाकरेंनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. राज ठाकरेंशी माझी चर्चा झाली आहे. काही मिळालं नाही, तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काहीजण असतात. राजकारणातील  मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असल्याचं ते म्हणाले आहेत," असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. 

'मी प्रत्येकाला काही देऊ शकत नाही,' राज ठाकरेंची हतबलता

"राज ठाकरे फार व्यथित आहेत. स्थानिकांनी व्यक्तिगत कारणांनी निर्णय घेतला आहे. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही असं राज ठाकरेंच म्हणणं आहे. प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला आता पाहिजेच, नाही दिलं तर जातो हे मानसिक अस्थिरतेचं लक्षण आहे," असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. 

संजय राऊतांनी टाळला संदीप देशपांडेंचा उल्लेख

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचा उल्लेख करणं टाळलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नेते उभे होते असं सांगत त्यांनी संदीप देशपांडेंचं नाव घेणं टाळलं. 

कल्याण डोंबिवलीत पक्षाने शिंदेंना पाठिंबा दिल्याने राज ठाकरे व्यथित; संजय राऊतांना फोनवरुन म्हणाले 'मी सोडून जातो अशा...'

 

"मनसे-शिवेसना एकत्र असताना एखाद्या चिन्हावर निवडून येत कोणी बेडूकउड्या मारत असेल तर पक्षाने, नेतृत्वाने कारवाई करुन महाराष्ट्राला या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं दाखवलं पाहिजे. राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नेते उभे होते. शिंदे गटाचे लोक मनसे म्हणजे एमआयएम आहे का? असं विचारत आहेत. तर नाही, पण आमच्यासाठी शिंदे गट एमआयएम आहे. मराठी माणसातील एमआयएम, बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणारेही त्या विशेषणांना पात्र ठरतात," अशी टीका त्यांनी केली आहे. 

संतोष धुरी यांच्यानंतर संदीप देशपांडेही मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. संदीप देशपांडे यांनी मात्र हे दावे फेटाळले होते. संतोष धुरी यांनी संदीप देशपांडेंना युतीच्या बोलणीत योग्य स्थान न मिळाल्याचा दावाही केला होता. अशातच संजय राऊतांनी त्यांचं नाव घेणं टाळणं एक सूचक इशारा असू शकतो. 

'बेईमानी कऱणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही'

पुढे ते म्हणाले, "सत्ता मिळाली नाही म्हणून अशी बेईमानी कऱणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. तुमची काही वैयक्तिक कारणं असतील तर ती तेवढ्यापुरती मर्यादित ठेवायला हवी. काहींच्या मागे ईडी, तपास यंत्रणा लागल्या असतील. पण त्यासाठी पक्ष वेठीस धरणं आणि गद्दारांशी हातमिळवणी करणं चुकीचं आहे. मी ईडीचं संकट आल्यानंतर पक्षाला वेठीस धरलं नाही. मी त्या संकाटाचा सामना केला. आजही माझी तब्येत खराब आहे. आता मी ऑपरेशन थिएटरमधून आलो आहे". 

"पक्षांतर करणारे हे मानसिक रुग्ण आहेत. मला आताच काहीतरी हवं आहे आणि मग शहर, गावाचा, राज्याचा, देशाचा, जगाचा विकास या नावाखाली पक्षांतरं वाढतील. महाराष्ट्रात अशा पक्षांतराची कीड वेळीस रोखणं न्यायालयाचं काम असतं. पण आज सर्वोच्च न्यायालयाने माती खाल्ली आहे. पक्षांतरासंदर्भात आज तारीख ठरवली असतानाही सुनावणी घेतली नाही याला म्हणतात माती खाणं आणि देशाच्या ऱ्हासाला हातभार लावणं," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More