नाशकात 100, 200 रुपयांत कपल्सला कोपरे उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर धाड!

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. 100 ते 200 रुपयांमध्ये मुला-मुलींना रुम उपलब्ध करुन दिले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 1, 2025, 05:29 PM IST
नाशकात 100, 200 रुपयांत कपल्सला कोपरे उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर धाड!

Nashik Crime News: नाशिक शहरात गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रु वस्तीत विद्याविकास सर्कल परिसरामध्ये एका कॅफेमध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला. या ठिकाणी तरुण-तरुणी गैरप्रकार करत असल्याची माहिती देवयानी फरांदे यांना मिळाली होती. त्यानंतर देवयानी फरांदे यांनी थेट या कॅफेवर छापा टाकला. यावेळी काही तरुण-तरुणी यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून या प्रकारामुळे नाशिक शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

नाशिकसारख्या धार्मिक शहरात असे अनेक गैरप्रकार सुरु आहेत. कॅफेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती समोर आली. यानंतर माहिती मिळताच आमदार देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना या कॅफे प्रकरणी ही माहिती दिली होती. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून देवयानी फरांदे यांनी थेट धडक कारवाई करण्याचे ठरविले. अचानक कॅफेवर छापा टाकताच कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना देखील मोठा धक्का बसला. आमदार पोहचल्याचे कळताच पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले.

100 ते 200 रुपयांमध्ये रूम उपलब्ध

कॅफे उघडून त्या ठिकाणी मुला-मुलींना प्रवेश दिला जात होता. तर काही कॅफेमध्ये तासांनुसार दर घेतले जात होते. या कॅफेमध्ये अंधार करुन काळे पडदे लावले जात होते. नाशिकमध्ये मोगली नामक कॅफेत हा गैरप्रकार सुरु असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जावून छापा टाकत ही कारवाई केली. त्यावेळी तरुण मुला मुलींना सुमारे 100 ते 200 रुपयांमध्ये रूम उपलब्ध करुन दिला जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी कॅफेमधील अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून अशाच प्रकारे आणखी काही कॅफेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे सध्या नाशिक शहरात नेमकं काय सुरु आहे. असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. या प्रकरणी आता कॅफेचालकांवर पोलिस काय करवाई करणार हे पाहावे लागेल. तर सध्या ताब्यात घेतलेल्या मुला-मुलींना त्यांच्या पालकांना बोलवून समज देण्यात येणार आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More