अकोला शहरात किरकोळ कारणावरून युवकावर हल्ला, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू, 7 आरोपींना अटक

अकोल्यात जेतवननगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या वादातून चाकू हल्ला झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या करण शितळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 24, 2025, 05:09 PM IST
अकोला शहरात किरकोळ कारणावरून युवकावर हल्ला, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू, 7 आरोपींना अटक

Akola Crime : अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, हल्ले आणि खुनाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्यावर चोरट्याने हल्ला करून त्याची हत्या केली होती. अशातच ही घटना ताजी असताना काल म्हणजे रविवारी अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये तीन युवकांवर ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणाने चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. 

ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणाने हल्लेखोरांनी तीन जणांवर चाकू हल्ला केला होता. यामध्ये एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव करण शितळे असं आहे.  करण शितळे हा त्याच्या मजुरीचे पैसे घेण्यासाठी जात असल्याच आईला सांगून घरून निघाला होता. घरी परतताना करण शितळेला एका ऑटोचा धक्का लागल्याने वाद निर्माण झाला.

यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या त्याच्या दोन मित्रांवर सुद्धा आरोपींनी हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या करण शितळेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेले त्याचे दोन साथीदार सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करतांना दिसत आहे.

या प्रकरणी खदान पोलिसांकडून 7 आरोपींना अटक

खदान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. या 8 आरोपींपैकी 4 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. तर यामधील एक आरोपी उद्याप फरार असून खदान पोलीस सध्या त्याचा शोध घेत असल्याच पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी म्हटलं आहे.  

किरकोळ कारणाने घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर वाढत्या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचे देखील प्रमाण वाढत असल्याचं या घटनेमधून दिसून येत आहे.