अजिंक्य रहाणेच्या खेळीवर भारताचं या सामन्यातील भविष्य अवलंबून कारण...
वर्ल्ड कप चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ आज (9 जून 2023) खेळवला जाणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या या सामन्यात भारतीय संघ सध्या अडचणीत असल्याचं चित्र दिसत आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभा केला आहे. स्टीव्ह स्मिथने 121 आणि ट्रेविस हेडने 163 धावांची खेळी केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अर्धा भारतीय संघ तंबूत परतला असून स्कोअरबोर्डवर केवळ 151 धावा आहेत.
भारत 318 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मैदानात अजिंक्य रहाणे (29 धावा) आणि के. एस. भरत (5 धावा) धावांवर खेळत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत भारताला अजिंक्य रहाणेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असून सामन्यामधील भारताची पुढील वाटचाल अजिंक्य कसा खेळतो यावर अवलंबून असेल.
IPL 2023 मध्ये रहाणेनं केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला पुन्हा भारतीय कसोटी संघामध्ये स्थान मिळालं आहे. रहाणेला संधी देण्यासंदर्भात धोनीचा सल्ला निवड समितीने घेतला होता असं सांगितलं जातं.
रहाणेनं यंदा सीएसकेकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 32.60 च्या सरासरीने 326 धावा केल्या आहेत.
WTC Final मधील सध्याच्या परिस्थितीमधून रहाणेच भारतीय संघाला बाहेर काढू शकतो असा भारतीय चाहत्यांना विश्वास आहे.
रहाणेनं कसोटीमध्ये झळकावलेल्या शतकांबद्दलचा एक अजब योगायोग सध्या चर्चेत आहे. जेव्हा जेव्हा रहाणेनं कसोटीत शतक झळकावलं आहे भारतीय संघ पराभूत झालेला नाही.
रहाणेनं एकूण 12 कसोटी शतकं झळकावली आहेत. त्यापैकी 9 कसोटी सामने भारताने जिंकलेत तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच रहाणेचं शतक आणि भारत पराभूत असं कधीही झालं नाही.
रहाणेच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 शतकं आहेत. त्याने वनडेमध्येही जेव्हा जेव्हा शतक झळकावलं आहे तेव्हा भारत जिंकला आहे.
अजिंक्यचं शतक आणि भारतीय संघाची कामगिरी याचं हे कनेक्शन पाहिल्यावर त्याने WTC मध्ये शतक झळकवावं अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.