बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकतंच फिट राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरी दीक्षितसोबत पौष्टिक आहाराची माहिती सांगणारा एक व्हिडीओ बनवला होता.
या व्हिडीओत माधुरीने डॉ. नेने यांना विचारले, "भारतात सण-उत्सवानंतर अनेकांचे वजन वाढते. कारण त्यावेळी मिठाई आणि गोड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे वजनात वाढ होते. पण मग ते पुन्हा कमी कसे करायचे", असा प्रश्न तिने विचारला होता.
त्यावर डॉ. नेने म्हणाले, "मी तुमच्या या गोष्टीशी निश्चितच सहमत आहे. भारतीय खाद्यपदार्थ फारच चांगले असतात. भारतातील सर्वच खाद्यपदार्थांची चव उत्कृष्ट असते. मी देखील प्रचंड फूडी आहे."
"पण जर तुम्ही चविष्ट पदार्थ खात असाल तर ते संयमाने खायला हवे. जर तुम्ही संयम बाळगून हे पदार्थ खाल्ले नाहीत, तर तुमचे नुकसान होऊ शकते."
यावर माधुरी म्हणाली, "नक्कीच. मी तुमच्या विचारांशी निश्चितच सहमत आहे. प्रत्येक गोष्टीत संयम हा फार महत्त्वाचा असतो."
"अनेक लोक दिवसभर उपाशी राहून डायटिंग करत असतात. यामुळे त्यांना डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवतो."
यावर डॉ. नेने म्हणाले, "कोणतेही डाएट करताना सर्वप्रथम तुम्हाला शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी तुम्ही काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे."
"प्रत्येकाने बॅलेन्स डाएट करणे गरजेचे आहे. विविध प्रकारची फळं खाल्ली पाहिजे. तसेच दिवसातून एकदा तरी व्यस्थित खायला हवं, जेणेकरुन तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही."
"जर तुम्ही जीमला जात असाल तर प्रोटीन किंवा फॅट असणाऱ्या डाएटचा समावेश करु शकता. हे पदार्थ तुम्हाला एनर्जी देतात. पण जर तुमची लाईफस्टाईल ही धावपळीची असेल तर मात्र तुम्ही हे डाएट करणे चुकीचे ठरेल."