संताप अनावर होताच सलमाननं 'या' मोठ्या दिग्दर्शकावर उगारला हात
सलमानचा संताप आणि त्याचा राग याविषयी चाहत्यांना आणि कलाजगतातील त्याच्या मित्रांनाही कल्पना असावी. अशा चर्चांच्या गराड्यात असणाऱ्या सलमाननं 2002 मधील एका मुलाखतीनं सर्वांना हैराण केलं होतं.
या मुलाखतीमध्ये त्यानं आपण दिग्दर्शक सुभाष घई यांच्या श्रीमुखात अर्थात कानाखाली लगावल्याचा गौप्यस्फोट करत सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या.
'मी कोणावरही राग काढण्यापेक्षा स्वत:वर राग काढतो. मुळात मी एकाच व्यक्तीवर हात उगारला होता. ती व्यक्ती म्हणजे सुभाष घई. यासाठी मी त्यांची क्षमाही मागितली होती', असं सलमान त्या मुलाखतीत म्हणाला होता.
असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्ही स्वत:वरचा ताबा गमावता, असं म्हणत त्यानं यामागचं कारण सांगितलं होतं. त्यांनी मला चमचानं मारलं... माझा गळा पकडला असं सांगताना पुढं मात्र स्वत:वरील ताबा गमावल्यानं त्यानं घई यांच्यावर हात उगारला होता.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सलमानच्या वडिलांनी सलीम खान यांनी घई यांची माफी मागत सलमानलाही त्यांची माफी मागण्यासाठी पाठवलं होतं.
सलमान आणि सुभाष घई यांच्यामधील हा वाद पुढं जाऊन मिटला आणि त्यांनी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'युवराज' चित्रपटाच्या वेळी एकत्र काम केलं. पण, आजही या दोन कलाकांमधील हा किस्सा हमखास चर्चेत येतो.