सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला व्यायाम तर सोडाच पुरेशी झोपही घेता येत नाही. याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
सध्याची जीवनशैली लक्षात घेत एक संशोधन करण्यात आलं. यानुसार मनुष्याने दिवसभरात किमान चार तास शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत आणि रात्री किमान आठ तासांची झोप घेतली पाहिजे.
शारीरिक हालचाल म्हणजे केवळ व्यायाम करणंच होत नाही. तर यामध्ये घरगुती कामे करणे आणि स्वयंपाक करणे यासारख्या दैनंदिन कामांचाही समावेश आहे
याशिवाय चार तासांपैकी किमान एक तास शारिरीक व्यायाम किंवा चालणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं संशोधनात नमुद करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने 24 तासांत दोन हजारांहून अधिक लोकांच्या दैनंदिन कामकाजाचं निरिक्षण केलं.
या निरिक्षणाचा उद्देश होता चांगल्या आरोग्यासाठी बसणं, झोपणे, उभं राहणं आणि शारीरिक हालचाली करणं यात घालवलेल्या वेळेचे योग्य प्रमाण काय असावे.
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये, सतत बसण्याची वेळ कमी करुन अधून-मधून शारीरिक हालचाली किंवा चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते, असंही या संशोधनातून समोर आलं आहे.